विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ऋतुजाताई शिंदे यांची तात्काळ धाव; पिराचीवाडी-दत्तनगर शाळेसाठी १५ लाखांचा निधी मंजूर!
![]()
दरड कोसळून शौचालय व किचनशेडचे नुकसान; संरक्षण भिंत, दुरुस्ती आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी युद्धपातळीवर उपाययोजना
वाई | प्रतिनिधी : वाई तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दत्तनगर (पिराचीवाडी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर मोठे संकट ओढवले आहे. शाळेच्या पाठीमागील डोंगराचा उतार मोठ्या प्रमाणात खचल्याने मातीचा भराव व दगड-गोटे थेट संरक्षण भिंतीलगत येऊन पोहोचले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून ग्रामस्थ व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते.
दरड कोसळल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या शौचालयाचे तसेच किचनशेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आणखी पाऊस झाल्यास डोंगराचा आणखी भाग खचून मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर शाळेच्या पाठीमागे मजबूत संरक्षण भिंत उभारणे, खचलेली माती व दगड-गोटे तातडीने हटविणे तसेच नुकसानग्रस्त शौचालय व किचनशेडची युद्धपातळीवर दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली होती.
या गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घेत बावधन जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्या तथा महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ऋतुजाताई शिंदे आणि युवा नेते विराज भैय्या शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांनी जिल्हा परिषद निधीतून तातडीने १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात येईल, असे ग्रामस्थांना आश्वासन दिले.
या निधीतून संरक्षण भिंतीसाठी ९ लाख रुपये, शौचालयाच्या दुरुस्तीसाठी ३ लाख रुपये आणि शाळेच्या किचनशेडच्या पत्र्यांसाठी ३ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून संबंधित कामे तातडीने सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी त्यांची तात्पुरती व्यवस्था मंदिरामध्ये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
यावेळी गटशिक्षणाधिकारी किरणकुमार मोरे, अभियंता केदार गायकवाड, चंद्रकांत मांढरे, सर्जेराव कोंडके, सामाजिक कार्यकर्ते युवराज कोंढाळकर, ग्रामसेविका धायगुडे मॅडम, शाळेचे शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी वेळेवर घेतलेला निर्णय, तातडीने मंजूर करण्यात आलेला निधी आणि कामे युद्धपातळीवर सुरू करण्याच्या सूचनांमुळे ग्रामस्थांनी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ऋतुजाताई शिंदे यांच्या तत्पर कार्यपद्धतीचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.





















