Sat, Sep 5, 2026
सहकार

जिल्हा बँकेच्या मतदार यादीवर ४९ आक्षेप; निवडणुकीच्या राजकीय हालचालींना वेग

जिल्हा बँकेच्या मतदार यादीवर ४९ आक्षेप; निवडणुकीच्या राजकीय हालचालींना वेग
Ashok Ithape
  • PublishedAugust 30, 2026

२ सप्टेंबरला सुनावणी, ७ सप्टेंबरला निकाल; ११ सप्टेंबरला अंतिम मतदार यादी

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीची राजकीय रंगत आता वाढू लागली आहे. निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर जिल्हाभरातून तब्बल ४९ आक्षेप दाखल झाल्याने सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या आक्षेपांवर २ सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथे सुनावणी होणार असून, ७ सप्टेंबरला निर्णय जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर ११ सप्टेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रतिनिधी निश्चित करण्याची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. विकास सेवा सोसायट्यांकडून ९६४, नागरी बँका व पतसंस्थांकडून ३८०, औद्योगिक व विणकर मतदारसंघातून ३३१, कृषी प्रक्रिया मतदारसंघातून २९, तर गृहनिर्माण व दूध उत्पादक संस्थांकडून २९७ असे एकूण २ हजार १२ ठराव सहकार विभागाकडे प्राप्त झाले आहेत.

या ठरावांच्या आधारे प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आली. जिल्हा बँकेसह संबंधित सहकार कार्यालयांमध्ये ही यादी प्रसिद्ध करून १८ ते २७ ऑगस्टदरम्यान आक्षेप मागविण्यात आले होते. या कालावधीत एकूण ४९ आक्षेप दाखल झाले आहेत.

आक्षेपांच्या निकालाकडे राजकीय नजरा

गावागावांत मतदान प्रतिनिधी निश्चित करताना अनेक ठिकाणी राजकीय रस्सीखेच आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे आता मतदार यादीवरील आक्षेपांच्या सुनावणीत कोणाचे नाव कायम राहते आणि कोणाच्या प्रतिनिधित्वावर गदा येते, याकडे इच्छुक उमेदवारांसह विविध राजकीय गटांचे लक्ष लागले आहे.

२ सप्टेंबरच्या सुनावणीनंतर ७ सप्टेंबरला आक्षेपांवरील निर्णय जाहीर होईल. त्यानंतर आवश्यक कार्यवाही पूर्ण करून ११ सप्टेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

अंतिम मतदार यादी स्पष्ट झाल्यानंतरच जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांना अधिकृत आकार येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काही दिवस सातारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रासाठी निर्णायक ठरणार आहेत.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!