कृष्णाकाठी उद्या रंगणार भक्तीचा सोहळा!
आचार्य भृगुऋषी मठातील ‘नारायण ज्ञानबोध’ पारायणाची भव्य सांगता; सद्गुरू टेंबे स्वामींची विशेष उपस्थिती
भुईंज : श्री क्षेत्र भुईंज येथील आचार्य भृगुऋषी मठाच्या वतीने श्रावण महिन्यानिमित्त गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या ‘श्री नारायण ज्ञानबोध’ ग्रंथाच्या पारायण सोहळ्याची भव्य सांगता शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता कृष्णा नदीच्या पवित्र तीरावर भक्तिमय वातावरणात होणार आहे. या सांगता सोहळ्यास सद्गुरू टेंबे स्वामी यांची विशेष उपस्थिती लाभणार असून, त्यांच्या मार्गदर्शनामुळे भाविकांना आध्यात्मिक पर्वणी मिळणार आहे.
या पारायण सोहळ्यात भुईंज व परिसरातील महिला भाविक, सेवेकरी तसेच ग्रामस्थांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला. श्री नारायण ज्ञानबोध ग्रंथाचे सामूहिक पारायण, वाचन व श्रवण यामुळे गेल्या आठ दिवसांपासून आचार्य भृगुऋषी मठ परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
उद्याच्या सांगता सोहळ्यासाठी मठ परिसरात विशेष तयारी करण्यात आली आहे. सद्गुरू टेंबे स्वामी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यात आध्यात्मिक मार्गदर्शन, प्रवचन तसेच विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. भाविक भक्तांच्या उपस्थितीत कृष्णाकाठी हा भक्तीचा जागर रंगणार आहे.
भक्ती, ज्ञान आणि सदाचाराचा संदेश घराघरात पोहोचावा तसेच नव्या पिढीला अध्यात्माची गोडी लागावी, या उद्देशाने या पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या सांगता सोहळ्यास भुईंजसह वाई तालुका व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सद्गुरू अण्णांच्या लेकी ग्रुप, शिष्य परिवार, आचार्य भृगुऋषी मठ सेवेकरी, दत्त सेवेकरी, ज्येष्ठ नागरिक संघ आणि पारायण मंडळ, भुईंज यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कृष्णाकाठी भक्तीचा महासोहळा!
शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणाऱ्या या भव्य सांगता सोहळ्यामुळे भुईंजची कृष्णाकाठची पवित्र भूमी सद्गुरूंच्या विचारांनी आणि भक्तिरसाने न्हाऊन निघणार आहे.





















