Tue, Jul 21, 2026
सामाजिक

घरं कोसळली, संसार उद्ध्वस्त… संकटग्रस्तांच्या मदतीला धावल्या मृणाल पाटील

घरं कोसळली, संसार उद्ध्वस्त… संकटग्रस्तांच्या मदतीला धावल्या मृणाल पाटील
Ashok Ithape
  • PublishedJuly 11, 2026

ढेबेवाडी विभागातील अतिवृष्टीग्रस्त कुटुंबांची प्रत्यक्ष भेट; जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, तातडीच्या पंचनाम्यांसह वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या सूचना

ढेबेवाडी | प्रतिनिधी : ढेबेवाडी विभागात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक कुटुंबांवर मोठे संकट कोसळले आहे. काही ठिकाणी घरे पूर्णपणे कोसळली, तर काहींच्या घरांची छप्परे उडाली. वीजेचे खांब कोसळल्याने अनेक गावांतील वीजपुरवठाही खंडित झाला. या संकटग्रस्त कुटुंबांच्या मदतीसाठी जिल्हा परिषद सदस्या मृणाल महेश पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत नुकसानग्रस्तांची प्रत्यक्ष भेट घेतली.

सळवे येथील सदुवर्षेवाडीमध्ये चार घरे पूर्णपणे कोसळून अनेक कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त झाला. सातर येथे एका घराचे छप्पर उडाले, तर आंबवडे, सातर, महिंद आणि मंद्रूळकोळे खुर्द येथे वीजेचे खांब कोसळल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला.

मृणाल पाटील यांनी प्रत्येक नुकसानग्रस्त कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी अन्नधान्य व अन्य जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून धीर देत, “तुम्ही एकटे नाही, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,” असा विश्वास व्यक्त केला. संकटाच्या काळात मिळालेल्या या मदतीमुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला.

यावेळी त्यांनी महसूल विभागाला तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांना वीजपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्याचे निर्देश दिले. पाहणी दौऱ्यात महेश पाटील व मनोज मोहिते उपस्थित होते.

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या जनसेवेच्या प्रेरणेतून संकटग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर राहण्याचा संकल्प व्यक्त करत, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना आवश्यक ती सर्व मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे मृणाल पाटील यांनी सांगितले. त्यांच्या या भेटीमुळे संकटग्रस्त कुटुंबांना मदतीबरोबरच मानसिक आधार आणि नव्याने उभे राहण्याची उमेद मिळाली.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!