खेळातून तंदुरुस्ती, शिस्त आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना
किसन वीर महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा
वाई, दि. २९ ऑगस्ट २०२६ : जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालय, वाई येथे हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयी आवड निर्माण व्हावी तसेच व्यायाम आणि शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व पटावे, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी फिटनेस ट्रेनर निलेश दवण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे होते. मेजर डॉ. समीर पवार यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला.
कॅडेट श्रावणी धनावडे यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाची माहिती दिली. मेहनत, शिस्त, चिकाटी आणि देशप्रेम यांची प्रेरणा विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनातून घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
प्रमुख अतिथी निलेश दवण यांनी शिक्षणासोबतच खेळालाही जीवनात महत्त्वाचे स्थान असल्याचे सांगितले. “खेळामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच आत्मविश्वास, शिस्त, नेतृत्वगुण आणि संघभावना विकसित होते,” असे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात नियमित व्यायामासाठी वेळ देऊन शारीरिक व मानसिक आरोग्य जपावे, असे आवाहन त्यांनी केले.
यानंतर सार्जंट आदिती येवले यांनी क्रीडाविषयक कविता सादर केली. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी खेळ हा केवळ मनोरंजनाचा भाग नसून विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासाचा महत्त्वाचा आधार असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत क्रीडा क्षेत्रातही सक्रिय सहभाग घेऊन महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रीय खेळाडू कॅडेट अनिकेत गाडवे यांनी उपस्थित खेळाडूंना क्रीडा शपथ दिली. विद्यार्थ्यांनी शिस्त, प्रामाणिकपणा, खिलाडूवृत्ती आणि संघभावना जपण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅडेट श्रावणी धनावडे यांनी केले, तर कॅडेट अनिकेत गाडवे यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे राष्ट्रीय क्रीडा दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.





















