राष्ट्रीय महामार्गावर दारूची तस्करी; पोलिसांच्या पाठलागानंतर दोघे ताब्यात
![]()
खंडाळा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ६ लाख १९ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त
खंडाळा, दि. २९ : सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरून विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना खंडाळा पोलिसांनी शिरवळ पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. या कारवाईत १ लाख १९ हजार १६० रुपये किमतीची विदेशी दारू आणि ५ लाख रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कार असा एकूण ६ लाख १९ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ११.४५ वाजता पारगाव हद्दीतून विदेशी दारूची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती खंडाळा पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक पारगाव स्टॉप येथे तैनात करण्यात आले.
दरम्यान, संशयित स्विफ्ट डिझायर कार आढळून आल्यानंतर पोलिसांनी ती थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने कार न थांबवता भरधाव वेगाने पुढे नेली. पोलिसांनी तत्काळ कारचा पाठलाग सुरू करून शिरवळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर शिंदेवाडी फाटा येथे शिरवळ पोलिसांनी नाकाबंदी केली. अखेर संशयित कार पोलिसांच्या ताब्यात आली.
कारची पंचांसमक्ष तपासणी केली असता त्यामध्ये १ लाख १९ हजार १६० रुपये किमतीची विदेशी दारू आढळून आली. दारूच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ५ लाख रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कारही पोलिसांनी जप्त केली.
या प्रकरणी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १६५/२०२६ नुसार महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५ (अ), (ई), ८३, ९८(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस फौजदार नाना धायगुडे करीत आहेत.
जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक एम. जे. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा व शिरवळ पोलिसांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.





















