कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल श्री. दिलीप भिकू शिंगटे यांचा यशवंतराव चव्हाण पुष्पौउत्पादन शेती पुरस्कार देऊन जिल्हा परिषदेकडून सन्मान.
भुईंज l प्रतिनिधी : कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने कृषी दिनानिमित्त *यशवंतराव चव्हाण पुष्पौउत्पादन शेती पुरस्कार* वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम जिल्हा परिषद, सातारा येथील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमात शेती क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रयोग, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब आणि उत्पादनवाढीसाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये खडकी येथील प्रगतिशील शेतकरी श्री दिलीप भिकू शिंगटे यांना उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया महेश शिंदे यांच्या शुभहस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी भुईंज जिल्हा परिषद गटाचे सदस्य दिलीप अण्णा बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद कृषी अधिकारी श्री गजानन ननावरे, सातारा जिल्हा कृषी अधीक्षक सौ. भाग्यश्री फरांदे, वाई तालुका पंचायत समितीचे कृषी अधिकारी श्री नारायणराव पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी शेतकऱ्यांना आधुनिक आणि शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करून उत्पादनवाढ साधण्याचे आवाहन केले.
श्री. दिलीप भिकू शिंगटे यांच्या या यशाबद्दल वाई पंचायत समिती सदस्या सौ. राणी कांतीलाल पवार, गटविकास अधिकारी (बी.डी.ओ.) श्री घोलप साहेब तसेच कृषी अधिकारी श्री गोळे साहेब यांनी त्यांचे अभिनंदन केले.
विशेष म्हणजे, श्री. दिलीप भिकू शिंगटे हे शेतीनिष्ठ प्रशांत भिकू शिंगटे यांचे मोठे बंधू असून, कुटुंबातील एकोप्यामुळे, परस्पर सहकार्यामुळे आणि सामूहिक परिश्रमांमुळे हा सन्मान प्राप्त झाल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. कुटुंबातील सर्व सदस्यांनी शेती व्यवसायाला प्राधान्य देत आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्याने हे यश शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.
दिलीप शिंगटे व त्यांच्या कुटुंबीयांचे खडकी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सर्व संचालक, ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य तसेच खडकी ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या पुरस्कारामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही आधुनिक, शाश्वत आणि प्रयोगशील शेती करण्याची प्रेरणा मिळणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.





















