Tue, Jul 21, 2026
शिक्षण

किसन वीर महाविद्यालयाच्या एनसीसी कॅडेट्सची राष्ट्रीय पातळीवर चमक; भारतीय नौदलासह विविध क्षेत्रांत यशाची पताका

किसन वीर महाविद्यालयाच्या एनसीसी कॅडेट्सची राष्ट्रीय पातळीवर चमक; भारतीय नौदलासह विविध क्षेत्रांत यशाची पताका
Ashok Ithape
  • PublishedJuly 3, 2026

सार्थक डेरेची भारतीय नौदलात निवड; आदित्य वाडकरचा ‘सायबर डिफेंडर कॅम्प’मध्ये सहभाग, आदित्य गुरवने विशेष जलक्रीडा प्रशिक्षण यशस्वीरीत्या केले पूर्ण

वाई, दि. ३ जुलै : जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) विभागातील कॅडेट्सनी विविध राष्ट्रीय स्तरावरील क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे. भारतीय नौदलातील निवडीपासून ते सायबर सुरक्षा आणि जलक्रीडा प्रशिक्षणापर्यंतच्या यशामुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाविद्यालयाचा एनसीसी कॅडेट सार्थक दत्तात्रय डेरे याची भारतीय नौदलात निवड झाली आहे. एनसीसीमधील प्रशिक्षणादरम्यान विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग, कठोर परिश्रम, शिस्त, चिकाटी आणि नेतृत्वगुण यांच्या बळावर त्याने हे यश संपादन केले. त्याच्या निवडीमुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना भारतीय सशस्त्र दलात करिअर करण्याची नवी प्रेरणा मिळाली आहे.

याचबरोबर कॅडेट आदित्य तुळशीदास वाडकर याने गुजरात येथील राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ (RRU) येथे NIELIT संस्थेमार्फत आयोजित **’सायबर डिफेंडर कॅम्प’**मध्ये सहभाग घेत उल्लेखनीय कामगिरी केली. या प्रशिक्षणात त्याने सायबर सिक्युरिटीची मूलभूत तत्त्वे, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टिम, मोबाईल सिक्युरिटी तसेच विविध अत्याधुनिक तांत्रिक साधनांचे प्रशिक्षण घेतले.

तसेच कॅडेट आदित्य विजय गुरव याने हिमाचल प्रदेशातील अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटन अँड अलाइड स्पोर्ट्स अंतर्गत रिजनल वॉटर स्पोर्ट्स ट्रेनिंग सेंटर, पोंग डॅम येथे आयोजित विशेष जलक्रीडा प्रशिक्षण अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करून महाविद्यालयाच्या यशात आणखी एक मानाचा अध्याय जोडला.

या तिन्ही विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे तसेच एनसीसी अधिकारी मेजर डॉ. समीर पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या उल्लेखनीय यशाबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदन (दादा) भोसले, उपाध्यक्ष मा. शंकरराव गाढवे, सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार प्रा. नारायण चौधरी, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य डॉ. विनोद वीर, २२ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, साताराचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अमर भोसले, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर लेफ्टनंट कर्नल आनंद सिंग, सुभेदार मेजर हिरेमठ तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

किसन वीर महाविद्यालयाच्या एनसीसी विभागातील विद्यार्थ्यांची ही यशस्वी वाटचाल महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणाची साक्ष देणारी ठरत असून, भविष्यात अधिकाधिक युवकांनी देशसेवेचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून पुढे यावे, असा प्रेरणादायी संदेश या यशातून मिळत आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!