Tue, Jul 21, 2026
देश विदेश

ट्रिपल तलाक कायद्याची राज्यात काटेकोर अंमलबजावणी होणार – गृह राज्यमंत्री योगेश कदम

ट्रिपल तलाक कायद्याची राज्यात काटेकोर अंमलबजावणी होणार – गृह राज्यमंत्री योगेश कदम
Ashok Ithape
  • PublishedJune 24, 2026

मुंबई, दि. २३ : राज्यात ट्रिपल तलाक प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल आणि कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली. मुस्लिम महिलांवरील अन्यायाच्या घटनांकडे शासन अत्यंत संवेदनशीलतेने पाहत असून पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन सक्षमपणे कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विधानसभा सदस्य देवयानी फरांदे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सना मलिक, अतुल भातखळकर, जयंत पाटील, मनीषा चौधरी, भास्कर जाधव, सुधीर मुनगंटीवार यांनी सहभाग घेतला. त्यास उत्तर देताना राज्यमंत्री कदम बोलत होते.

राज्यमंत्री कदम म्हणाले की, कायद्याची अंमलबजावणी ही सर्व नागरिकांसाठी समान न्याय सुनिश्चित करण्यासाठी आहे. सर्व धर्मीयांना समान न्याय देण्याची शासनाची भूमिका आहे. नाशिकमध्ये ८ मे २०२६ रोजी एका महिलेने तिच्या पतीकडून फोनवर तलाक दिल्याची तक्रार दाखल झाली. त्यानंतर संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या आठ दिवसांत त्या महिलेवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणातही गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित आरोपी सध्या अटकेत आहे.

राज्यात ट्रिपल तलाकच्या तक्रारींची आकडेवारी मांडताना त्यांनी सांगितले की, २०२४ मध्ये अशा स्वरूपाचे ४२ गुन्हे दाखल झाले असून सर्व तक्रारी सत्य असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणांमध्ये १५२ आरोपींवर कारवाई करण्यात आली, तर २०२५ मध्ये ३९ गुन्हे दाखल झाले असून १३७ आरोपींवर कारवाई करण्यात आली आणि ९५ जणांना अटक करण्यात आली. या प्रश्नाकडे राजकारण किंवा धार्मिक दृष्टिकोनातून न पाहता महिलांच्या न्यायाच्या दृष्टीने पाहिले पाहिजे. केंद्र शासनाने लागू केलेल्या ट्रिपल तलाक प्रतिबंधक कायद्यामुळे फोन, संदेश किंवा ई-मेलद्वारे तलाक देण्यास प्रतिबंध करण्यात आला असून या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे.

            समान नागरी कायदा (यूसीसी) संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, राज्य शासन या विषयाबाबत सकारात्मक असून यूसीसीचा मसुदा, अभ्यास आणि अभिप्रायासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्यात यूसीसी लागू करण्याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल.

बहुपत्नीत्वाच्या (पॉलिगामी) प्रश्नावर राज्यमंत्री कदम म्हणाले की, यूसीसी लागू झाल्यानंतर विवाहविषयक समान नियमांची अंमलबजावणी करण्यात येईल. त्यावेळी बहुपत्नीत्वासंदर्भातील आवश्यक तरतुदी आणि निर्बंधांचाही विचार केला जाईल. मुस्लिम महिलांना संरक्षण आणि न्याय देण्याबाबत सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!