Tue, Jul 21, 2026
सातारा जिल्हा

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पुढाकारातून जिल्हा लोकल बोर्ड इमारतीचे पुनरुज्जीवन

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पुढाकारातून जिल्हा लोकल बोर्ड इमारतीचे पुनरुज्जीवन
Ashok Ithape
  • PublishedJune 24, 2026

सामाजिक वारशाला नवी झळाळी

मुंबई, दि. _ : “जिल्हा लोकल बोर्ड इमारत ही माझ्यासाठी केवळ एक वास्तू नाही, तर माझ्या पूर्वजांच्या जनसेवेचा, विचारांचा आणि साताऱ्याच्या अस्मितेचा जिवंत इतिहास आहे. ज्या वास्तूमधून लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी सार्वजनिक जीवनाची मुहूर्तमेढ रोवली, त्या वास्तूचे जतन आणि पुनरुज्जीवन करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी भावनिक आणि अभिमानाची बाब आहे,” असे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून या ऐतिहासिक वास्तूच्या जतन व नूतनीकरणासाठी जिल्हा नियोजन विकास समिती (डीपीडीसी) आणि जिल्हा परिषद उपकर निधीतून एकूण ४ कोटी १५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीतून वारसा वास्तूचे मूळ स्वरूप जपत तिचे संवर्धन आणि पुनरुज्जीवन करण्यात आले आहे.

सातारा-सांगली जिल्ह्याचे मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या तत्कालीन जिल्हा लोकल बोर्डवर धनदांडग्या लोकांची मक्तेदारी मोडीत काढून लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी आपल्या सामाजिक आणि सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली.

इ.स. १९४० मध्ये या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जनसेवेचा पाया रचला आणि पुढे सलग ११ वर्षे जिल्हा लोकल बोर्डचे चेअरमन म्हणून कार्य करत ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य आणि लोककल्याणाला नवी दिशा दिली. त्यामुळे ही वास्तू केवळ प्रशासकीय इमारत नसून साताऱ्याच्या सामाजिक आणि राजकीय परिवर्तनाची साक्षीदार ठरली आहे.

या ऐतिहासिक वास्तूचे जतन आणि संवर्धन करून ती अधिक प्रेरणादायी बनवावी, असा मानस लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केला. त्यांनी केवळ एका वास्तूचे नूतनीकरण केले नाही, तर गेल्या सुमारे ९० वर्षांचा राजकीय आणि सामाजिक इतिहास नव्या पिढीसमोर उभा करण्याचा प्रयत्न केला आहे.

साताऱ्याच्या राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय इतिहासाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक जिल्हा लोकल बोर्ड इमारतीचे जतन आणि नूतनीकरण करण्यात आले असून, या कामामुळे या वारसा वास्तूला नवी झळाळी प्राप्त झाली आहे.

या नूतनीकरणात वास्तूचे मूळ स्थापत्य सौंदर्य, ऐतिहासिक वैशिष्ट्ये आणि पारंपरिक ओळख जपण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

या वास्तूशी देसाई कुटुंबाचे तसेच सातारा वासियांचे केवळ राजकीय नव्हे, तर भावनिक नातेही जोडलेले आहे. त्यामुळे या इमारतीचे संवर्धन हे केवळ विकासकाम नसून, एका वैचारिक आणि सामाजिक वारशाचे जतन करण्याचे कार्य आहे. काळाच्या ओघात अनेक महत्त्वाच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींची साक्षीदार ठरलेल्या या वास्तूच्या प्रत्येक दालनात साताऱ्याच्या प्रगतीचा इतिहास दडलेला आहे.

या ऐतिहासिक ठेव्याचे जतन करताना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, वारसा वास्तूचे मूळ स्वरूप कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे इतिहास आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम या वास्तूमध्ये अनुभवायला मिळत आहे.

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, “वारसा वास्तूंचे संवर्धन म्हणजे केवळ जुन्या इमारतींचे संरक्षण नव्हे, तर आपल्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि सामूहिक स्मृतींचा सन्मान होय.

जिल्हा लोकल बोर्ड इमारतीचे नूतनीकरण हे माझ्यासाठी विकासकामापेक्षा अधिक, महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मृतींना आणि कार्याला वाहिलेली कृतज्ञ आदरांजली आहे.”

साताऱ्याच्या ऐतिहासिक ओळखीचे प्रतीक असलेल्या या वास्तूच्या पुनरुज्जीवनामुळे वारसा संवर्धनाच्या चळवळीला नवे बळ मिळाले असून, भावी पिढ्यांसाठी इतिहासाचा हा अमूल्य ठेवा अधिक सक्षमपणे जतन करण्यात आला आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!