Sat, Sep 5, 2026
सातारा जिल्हा

नेपाळच्या पूरस्थितीत महाबळेश्वरच्या दहा महिला पर्यटक सुखरूप

नेपाळच्या पूरस्थितीत महाबळेश्वरच्या दहा महिला पर्यटक सुखरूप
Ashok Ithape
  • PublishedAugust 27, 2026

पूरग्रस्त भागापासून २५० ते ३०० किलोमीटर दूर पोखरा येथे सुरक्षित मुक्काम; मंत्री मकरंद पाटील, पालकमंत्री शंभूराज देसाई व जिल्हा प्रशासन संपर्कात

महाबळेश्वर : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पुरामुळे काही भागात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असली, तरी महाबळेश्वर येथून पर्यटनासाठी नेपाळला गेलेल्या दहा महिला पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. या महिला सध्या पोखरा शहरातील हॉटेलमध्ये सुरक्षित असून, पूरग्रस्त भागापासून त्या सुमारे २५० ते ३०० किलोमीटर अंतरावर आहेत. त्यामुळे महाबळेश्वरसह सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे संबंधित महिला पर्यटकांनी स्पष्ट केले आहे.

सातारा जिल्हा महिला उपप्रमुख मेघा मंगेश चोरघे आणि त्यांच्या नऊ मैत्रिणी पर्यटनासाठी नेपाळला गेल्या आहेत. नेपाळमधील पूरस्थितीची माहिती मिळाल्यानंतर गुरुवारी सकाळी त्यांच्याशी व्हॉट्सॲप फोनद्वारे संपर्क साधण्यात आला. यावेळी सर्व महिला सुरक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली.

मेघा चोरघे यांनी सांगितले की, “मी आणि माझ्या नऊ मैत्रिणी पोखरा शहरातील हॉटेलमध्ये सुरक्षित आहोत. ज्या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे, तो परिसर आमच्या मुक्कामाच्या ठिकाणापासून सुमारे २५० ते ३०० किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे या पूरस्थितीचा आमच्यावर कोणताही परिणाम झालेला नाही.”

दरम्यान, महिला पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत मंत्री मकरंद पाटील, पालकमंत्री शंभूराज देसाई तसेच सातारा जिल्हा प्रशासनाने संपर्क साधून विचारपूस केली आहे. प्रशासन सातत्याने त्यांच्या संपर्कात असल्याने त्यांच्या सुरक्षिततेबाबत सध्या कोणतीही चिंता करण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

एसआयटी टूर अँड ट्रॅव्हल्सच्या प्रतिनिधींनीही पर्यटन दौरा सुरळीत सुरू असल्याचे सांगितले. साईटसीइंग, मंदिरदर्शन आदी कार्यक्रम नियोजनानुसार पार पडले आहेत. पुढील टप्प्यात काठमांडू येथे जाण्याचे नियोजन असून, काठमांडूकडे जाणारा मार्ग काही कारणास्तव बंद झाला होता. मार्ग पुन्हा सुरू झाल्यानंतर काठमांडू येथे जाऊन पशुपतिनाथ मंदिराचे दर्शन घेण्याचे नियोजन असल्याचे प्रतिनिधींनी सांगितले.

पूराची घटना त्यांच्या नियोजित पर्यटन मार्गापासून दूर असल्याने संपूर्ण महिला पर्यटकांचा गट सुरक्षित असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

“महाराष्ट्र आणि सातारा जिल्ह्यातील अनेक जण आमची काळजी घेऊन फोन करत आहेत. मात्र आम्ही सर्वजणी सुरक्षित आहोत. मंत्री मकरंद पाटील, पालकमंत्री शंभूराज देसाई आणि जिल्हा प्रशासन आमच्या संपर्कात असून सातत्याने आमची विचारपूस केली जात आहे,” असे मेघा चोरघे यांनी सांगितले.

महिला पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती मिळाल्याने महाबळेश्वर आणि सातारा जिल्ह्यातील त्यांच्या कुटुंबीयांनी तसेच नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!