Sat, Sep 5, 2026
स्थानिक बातम्या

गुणवंतांचा गौरव, समाजएकतेचा जागर!

गुणवंतांचा गौरव, समाजएकतेचा जागर!
Ashok Ithape
  • PublishedAugust 28, 2026

भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव सोहळा वाईत उत्साहात संपन्न

वाई, दि. २७ : स्वकुळ साळी समाज वाईच्या वतीने ‘आदि वस्त्रनिर्माता शिवपुत्र भगवान श्री जिव्हेश्वर’ यांचा जन्मोत्सव सोहळा कृष्णोत्सव मंगल कार्यालय, वाई येथे भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. धार्मिक विधी, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार तसेच समाजातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन यामुळे सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वकुळ साळी समाज वाईचे अध्यक्ष महेंद्र धेडे होते. प्रमुख अतिथी म्हणून सातारा जिल्हा सांस्कृतिक विकास मंचचे अध्यक्ष विवेक ठोके, जिल्हा स्वकुळ साळी समाज संघटनेचे अध्यक्ष महेश पागडे, कार्याध्यक्ष सुरेश पांढरपट्टे, सचिव उमेश घट्टे, तसेच संचालक योगेश कुचेकर, श्रीकांत डिंगणकर व बाबुराव (छत्रपती) डांगरे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन रवींद्रकुमार लटिंगे यांनी केले. यावेळी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसह टीईटी परीक्षेत यश संपादन केलेल्या समाजबांधवांचा मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये कु. वीरजा विजयकुमार साळी, श्रेया योगेश पोरे, विहान उमेश तांबे, संस्कृती सचिन दाहोत्रे, वरद शैलेंद्र धेडे, श्रेयस सचिन सातपुते, ऋग्वेद राजेश दातरंगे आणि सौ. विद्या विजयकुमार साळी यांचा समावेश होता.

सातारा जिल्हा कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल दत्ता मर्ढेकर, योगेश दाहोत्रे, आनंदा सुकाळे, मयूर कोदे, डॉ. शैलेंद्र धेडे, सौ. सारिका गवते, सौ. सोनाली दाहोत्रे, सौ. सोनाली कोदे, सौ. वनिता हावरे व सौ. इर्षा तांबे यांचाही मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी मनोगत व्यक्त करताना विवेक ठोके यांनी वाई शहरात भगवान श्री जिव्हेश्वर महाराजांचे भव्य मंदिर पूर्णत्वास यावे, अशी मनोकामना व्यक्त केली. मंदिराच्या उभारणीसाठी सर्वतोपरी मदत व मार्गदर्शन करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याची ग्वाही दिली.

महेश पागडे यांनी समाज संघटनेच्या मजबुतीकरणाबरोबरच विवाह संस्थेच्या महत्त्वावर भाष्य केले. स्वजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी वयाच्या २२ व्या वर्षी स्वसमाजात विवाह करणाऱ्या पहिल्या ५० वधू-वरांना प्रत्येकी ११ हजार रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा त्यांनी केली.

सुरेश पांढरपट्टे यांनी संघटित राहूनच समाजाची सर्वांगीण प्रगती साधता येते, असे प्रतिपादन केले. दत्ता मर्ढेकर यांनीही समयोचित विचार व्यक्त करून समाजबांधवांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी वाई तालुका कार्यकारिणीचे उपाध्यक्ष रमेश भागवत, अतुल मर्ढेकर यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सौ. मनीषा अरबुणे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सौ. विद्या साळी यांनी मानले. शेवटी भगवान श्री जिव्हेश्वर महाराजांच्या आरतीनंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची भक्तिमय वातावरणात सांगता झाली.

फोटो ओळ :
विवेक ठोके यांचा सत्कार करताना चंद्रशेखर मर्ढेकर. शेजारी महेश पागडे, सुरेश पांढरपट्टे व इतर मान्यवर.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!