राज्यस्तरीय रिंक फुटबॉल स्पर्धेत पाचगणीच्या विद्या निकेतनचा दमदार झेंडा; महाराष्ट्रात पटकावला तृतीय क्रमांक!
![]()
१२ वर्षांखालील ६-अ-साइड संघाची शानदार कामगिरी; वेगवान खेळ, उत्कृष्ट संघभावना आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाने राज्यभरात मिळवला मानाचा बहुमान
पाचगणी : क्रीडा पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचगणीतील नामांकित विद्या निकेतन हायस्कूलने क्रीडा क्षेत्रात आणखी एक सुवर्णपान जोडत राज्यस्तरीय रिंक फुटबॉल स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. संजीवन विद्यालय येथे २७ व २८ जून २०२६ रोजी पार पडलेल्या इंटर-स्कूल स्टेट रिंक फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये १२ वर्षांखालील मुलांच्या ६-अ-साइड संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत संपूर्ण महाराष्ट्रात तृतीय क्रमांक पटकावला.
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत राज्यभरातील नामांकित शाळांचे संघ सहभागी झाले होते. अत्यंत चुरशीच्या सामन्यांमध्ये विद्या निकेतनच्या खेळाडूंनी वेगवान खेळ, अचूक पासिंग, उत्कृष्ट ड्रिब्लिंग आणि प्रभावी सांघिक समन्वयाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज देत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. अखेर तृतीय क्रमांक पटकावत त्यांनी पाचगणीच्या क्रीडा परंपरेत आणखी एका यशाची भर घातली.
विद्या निकेतन हायस्कूलमध्ये शैक्षणिक गुणवत्तेसोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडेला विशेष प्रोत्साहन दिले जाते. त्याचाच परिणाम म्हणून विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर शाळेचा नावलौकिक उंचावला आहे.
या यशाबद्दल प्राचार्य अथर्व बिरामणे यांनी खेळाडू आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन करत, “खेळातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि संघभावना विकसित होते. हे यश त्यांच्या मेहनतीचे आणि प्रशिक्षकांच्या समर्पणाचे फळ आहे,” असे सांगितले.
संस्थेच्या संचालिका स्वाती महेश बिरामणे यांनीही विजेत्या संघाचे कौतुक करत, “आमचे विद्यार्थी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही राज्यभर शाळेचे नाव उज्ज्वल करत आहेत. भविष्यात हेच खेळाडू राष्ट्रीय स्तरावर चमकतील, यासाठी संस्था सर्वतोपरी सहकार्य करेल,” असा विश्वास व्यक्त केला.
संघाच्या या यशामागे क्रीडा शिक्षक नितीन सपकाळ यांचे नियोजनबद्ध प्रशिक्षण, सातत्यपूर्ण सराव आणि प्रेरणादायी मार्गदर्शन मोलाचे ठरले.
विद्या निकेतन हायस्कूलच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे संपूर्ण पाचगणी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विजेत्या खेळाडूंवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राज्यस्तरावरील हे यश भविष्यात राष्ट्रीय स्तरावरील मोठ्या कामगिरीची नांदी ठरेल, असा विश्वास क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे.





















