देशसेवेचा गौरव; भारतीय नौदलात निवड झालेल्या ज्योतिरमय घाडगे यांचा एसबीआय भुईंजतर्फे सत्कार
![]()
“देशाच्या सीमेवरील जवान आणि शिवारातील किसान हेच राष्ट्राचे खरे आधारस्तंभ; त्यांच्या सेवेसाठी स्टेट बँक सदैव कटिबद्ध” – शाखाधिकारी सुहास हेंद्रे
भुईंज : देशाच्या सीमेवर लढणारा जवान आणि शिवारात राबून देशाला अन्नधान्य पुरवणारा किसान यांच्यामुळेच राष्ट्र अभिमानाने पुढे जात आहे. त्यामुळे जवान आणि किसान यांच्या सेवेसाठी भारतीय स्टेट बँक सदैव कटिबद्ध व बांधील आहे, असे प्रतिपादन भारतीय स्टेट बँक, भुईंज शाखेचे शाखाधिकारी सुहास हेंद्रे यांनी केले.
भारतीय स्टेट बँक, भुईंज शाखेचे सुरक्षा अधिकारी नितीन घाडगे यांचे सुपुत्र ज्योतिरमय नितीन घाडगे यांची भारतीय नौदलात निवड झाल्याबद्दल बँकेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
सुहास हेंद्रे पुढे म्हणाले की, बेलमाची येथील सुपुत्र नितीन घाडगे यांनी भारतीय सैन्यदलात उल्लेखनीय सेवा बजावत विशेषतः कारगिल युद्धात महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली.
सेवानिवृत्तीनंतरही ते जवान आणि किसान यांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कुटुंबात देशसेवेचे संस्कार रुजवले. त्याच प्रेरणेतून त्यांचे सुपुत्र ज्योतिरमय यांची भारतीय नौदलात निवड झाली असून, हा संपूर्ण बँकेसह परिसरासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रारंभी बँकेच्या खातेदारांच्या वतीने पत्रकार जयवंत पिसाळ, तर ग्रामस्थांच्या वतीने लक्ष्मणराव वारागडे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास बँकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत राजेश पांचागे यांनी केले. प्रास्ताविक प्रेरणा कांबळे यांनी केले, सूत्रसंचालन अभिषेक भोसले यांनी केले, तर आभार स्नेहल कविटकर यांनी मानले.
फोटो ओळी : भुईंज येथील भारतीय स्टेट बँकेत भारतीय नौदलात निवड झालेल्या ज्योतिरमय नितीन घाडगे यांचा सत्कार करताना शाखाधिकारी सुहास हेंद्रे तसेच उपस्थित मान्यवर.





















