कमरेला लोडेड पिस्तूल लावून फिरणाऱ्याला भुईंज पोलिसांनी ठोकल्या बेड्या;
सुरूर पुलाखाली मध्यरात्री पोलिसांची धडाकेबाज कारवाई
भुईंज : कमरेला लोड केलेले पिस्तूल लावून संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका व्यक्तीला भुईंज पोलिसांनी मध्यरात्री सुरूर पुलाखाली ताब्यात घेतले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे घडू शकणारा गंभीर अनुचित प्रकार टळला असून, या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या वेळी पोलिसांचे गस्त पथक पेट्रोलिंग करत होते. यावेळी सुरूर पुलाखाली एक व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरताना पोलिसांच्या निदर्शनास आली. पोलिसांना पाहून त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पथकाने त्याची चौकशी केली.
तपासणीदरम्यान त्याच्या कमरेला पिस्तूल असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेत पिस्तूल जप्त केले. पिस्तूल लोडेड असल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याने पोलिसांनी अधिक सतर्कता बाळगत संबंधित व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
या प्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपीकडे पिस्तूल कुठून आले, ते बाळगण्याचा त्याच्याकडे परवाना आहे का, तसेच तो मध्यरात्री सुरूर पुलाखाली नेमका कोणत्या उद्देशाने फिरत होता, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, रात्रीच्या वेळी संशयास्पद व्यक्ती व वाहनांवर पोलिसांकडून बारकाईने नजर ठेवण्यात येत असून, अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. सुरूर पुलाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे भुईंज पोलिसांच्या सतर्क गस्तीचेही कौतुक होत आहे.
पुढील तपास भुईंज पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.





















