ग्रामीण प्रतिभेचा राज्यभर गौरव; ओझर्डेच्या पीएमश्री शाळेने शिष्यवृत्तीत रचला नवा इतिहास
![]()
गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव; ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये अफाट गुणवत्ता, पालकांनी शिक्षकांवर विश्वास ठेवावा : लहुराज पांढरे
वाई, प्रतिनिधी : ग्रामीण भागातच खरे टॅलेंट दडलेले असून गुणवंत विद्यार्थी घडत असताना पालकांनी मुलांवर आणि शिक्षकांवर विश्वास ठेवला पाहिजे. विद्यार्थी शिक्षकांचे मार्गदर्शन मनापासून स्वीकारतील, तर त्यांचे भविष्य निश्चितच उज्ज्वल होईल, असे प्रतिपादन कलासागर अॅकॅडमीचे संचालक लहुराज पांढरे यांनी केले.
पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ओझर्डे येथे इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावणारी कु. स्वरा आशुतोष गार्डी तसेच राज्यात चौथा क्रमांक मिळवणारा स्वराज श्रीनिवास कुंभार यांच्यासह मार्गदर्शक शिक्षकांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सौ. रेखा जमदाडे होत्या. यावेळी कृषिमित्र अरुण आदलिंगे, योगेश पिसाळ, शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षिका सविता क्षीरसागर, शोभा पवार तसेच सुनील गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अरुण आदलिंगे म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थीच शिक्षण क्षेत्रात नवी क्रांती घडवू शकतात. राज्यात पटसंख्येअभावी अनेक शाळा बंद होण्याच्या उंबरठ्यावर असताना पीएमश्री जि.प. प्रा. शाळा, ओझर्डेने मिळवलेले हे यश अत्यंत प्रेरणादायी आहे. मराठी शाळा टिकवण्यासाठी ग्रामस्थ, पालक आणि शिक्षण चळवळीतील कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे पुढाकार घेऊन शिक्षण चळवळ अधिक बळकट करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात मुख्याध्यापिका सौ. रेखा जमदाडे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार केला. सुनील गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सौ. शोभा पवार यांनी, तर आभार प्रदर्शन सौ. मंगल फरांदे यांनी केले.
या कार्यक्रमास अॅड. प्रतापसिंह पिसाळ-देशमुख, जयश्री कांबळे, शशिकांत भंडारे, अनुष्का पिसाळ, सुषमा पिसाळ, सुप्रिया जाधव यांच्यासह पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





















