Sat, Sep 5, 2026
महिला विशेष

‘नारीशक्ती’ला जिल्हाभर उत्स्फूर्त प्रतिसाद; हजारो विद्यार्थिनींनी घेतले स्वयंरक्षणाचे धडे

‘नारीशक्ती’ला जिल्हाभर उत्स्फूर्त प्रतिसाद; हजारो विद्यार्थिनींनी घेतले स्वयंरक्षणाचे धडे
Ashok Ithape
  • PublishedSeptember 3, 2026

सातारा जिल्हा पोलीस दलाचा विशेष उपक्रम; आत्मविश्वास, प्रसंगावधान आणि प्रतिकारक्षमता वाढविण्यावर भर

सातारा : ‘महिला सुरक्षित तर समाज सुरक्षित’ या संकल्पनेतून सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘नारीशक्ती : महिला सुरक्षित तर समाज सुरक्षित’ या विशेष उपक्रमाला विद्यार्थिनी, विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमासाठी भारतातील पहिल्या महिला ॲक्शन डायरेक्टर म्हणून परिचित असलेल्या शैला टीके कुलकर्णी आणि त्यांच्या टीमला विशेष मार्गदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींना विविध स्वयंरक्षण तंत्रांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिके देण्यात येत आहेत.

स्वयंरक्षण म्हणजे केवळ शारीरिक ताकद नव्हे, तर प्रसंगावधान, मानसिक ताकद, आत्मविश्वास, बौद्धिक सजगता आणि संकटाच्या वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता महत्त्वाची असल्याचे प्रशिक्षणातून विद्यार्थिनींच्या मनावर बिंबविण्यात येत आहे. संकटाच्या प्रसंगी घाबरून न जाता स्वतःचा बचाव कसा करावा आणि गरज पडल्यास प्रतिकार कसा करावा, याचे व्यावहारिक प्रशिक्षण देण्यात येत आहे.

कराडमध्ये साडेसहा हजार विद्यार्थिनींचा सहभाग

१ सप्टेंबर रोजी SGM कॉलेज, कराड येथे झालेल्या कार्यक्रमात सुमारे ५ हजार विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. शैला कुलकर्णी व त्यांच्या टीमच्या प्रात्यक्षिकांना विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याच दिवशी महिला महाविद्यालय, कराड येथे झालेल्या कार्यक्रमात सुमारे १ हजार ५०० विद्यार्थिनी सहभागी झाल्या. हा कार्यक्रम विद्यार्थिनींसाठी अत्यंत उपयुक्त आणि महाविद्यालयातील आजवरच्या कार्यक्रमांपैकी सर्वोत्कृष्ट असल्याचे प्राचार्यांनी नमूद केले.

यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये पाच हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

२ सप्टेंबर रोजी यशोदा टेक्निकल कॅम्पस, सातारा येथे झालेल्या कार्यक्रमात इंजिनिअरिंग, कॉमर्स, फार्मसी आदी शाखांमधील जवळपास ५ हजार विद्यार्थी प्रत्यक्ष तसेच ऑनलाइन माध्यमातून सहभागी झाले. स्वयंरक्षणाची तंत्रे, प्रसंगावधान आणि संकटाच्या वेळी बचाव करण्याच्या पद्धती विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने आत्मसात केल्या.

साताऱ्यात ७ ते ८ हजार विद्यार्थिनींची उपस्थिती

२ सप्टेंबर रोजी दुपारी मल्टीपर्पज हॉल, राधिका रोड येथे सातारा शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थिनींसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला सुमारे ७ ते ८ हजार विद्यार्थिनी उपस्थित होत्या. विशेष म्हणजे विद्यार्थिनींनी केवळ उपस्थिती नोंदवून न थांबता स्वयंरक्षणाच्या प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांमध्येही उत्स्फूर्त सहभाग घेतला.

कार्यक्रमानंतर शैला कुलकर्णी यांच्यासोबत छायाचित्रे काढण्यासाठी आणि स्वाक्षरी घेण्यासाठी विद्यार्थिनींची मोठी गर्दी झाली. त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा उत्साह आणि आत्मविश्वास उपस्थितांसाठी भावनिक क्षण ठरला.

‘मी स्वतःचे संरक्षण करू शकते’ हा आत्मविश्वास निर्माण करण्यावर भर

या उपक्रमाचा उद्देश केवळ शारीरिक तंत्र शिकविणे नसून, ‘मी स्वतःचे संरक्षण करू शकते’ हा आत्मविश्वास विद्यार्थिनींच्या मनात निर्माण करणे हा आहे. संकटाच्या प्रसंगी परिस्थितीचे भान ठेवून योग्य निर्णय घेणे आणि गरज पडल्यास प्रतिकार करण्यासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम बनविण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.

या उपक्रमाचे पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून कौतुक होत असून, सोशल मीडिया तसेच दूरध्वनीद्वारे पोलीस दलाचे आभार मानण्यात येत आहेत. महिला सुरक्षित असेल तर कुटुंब सुरक्षित राहते आणि कुटुंब सुरक्षित असेल तर समाज सुरक्षित राहतो, या विचारातून सुरू झालेला हा उपक्रम महिला सुरक्षेबाबत सकारात्मक जनजागृती निर्माण करणारा ठरत आहे.

वाई, फलटणमध्ये आज स्वयंरक्षण प्रशिक्षण

‘नारीशक्ती’ उपक्रमांतर्गत ३ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत कन्या शाळा, वाई येथे, तर दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत मुधोजी हायस्कूल, फलटण येथे विद्यार्थिनींसाठी स्वयंरक्षण प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. शैला कुलकर्णी आणि त्यांच्या टीमकडून प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

‘स्वयंरक्षण शिका, आत्मविश्वास वाढवा आणि सुरक्षित समाजाच्या निर्मितीत सहभागी व्हा’, या संदेशातून सातारा जिल्हा पोलीस दलाचा ‘नारीशक्ती’ उपक्रम जिल्ह्यात महिला सुरक्षेची नवी जाणीव निर्माण करीत आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!