Fri, May 29, 2026
Close

Recent Posts

क्राईम न्यूज

पश्चिम भागात केबल चोरांचा धुमाकूळ; पाणीपुरवठा योजना धोक्यात

पश्चिम भागात केबल चोरांचा धुमाकूळ; पाणीपुरवठा योजना धोक्यात
Ashok Ithape
  • PublishedMay 18, 2026

मोटारी-केबल चोरीमुळे गावांवर पाणीटंचाईचे संकट; पोलिसांनी तातडीने कडक कारवाई करावी, ग्रामस्थांची मागणी

वाई | प्रतिनिधी : वाई तालुक्यातील पश्चिम भागातील वेलंगसह धरणालगतच्या अनेक गावांमध्ये ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनांच्या मोटारी व केबल चोरीच्या घटनांनी नागरिक हैराण झाले आहेत. वारंवार होणाऱ्या या चोऱ्यांमुळे गावांवर गंभीर पाणीटंचाईचे संकट ओढावले असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

ऐन उन्हाळ्यात मुंबई-पुण्यासारख्या शहरांतून गावाकडे आलेल्या नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाणीपुरवठा योजनेच्या केबल व मोटारी चोरट्यांकडून वारंवार लंपास केल्या जात असल्याने ग्रामस्थांचे हाल होत असून प्रशासन मात्र निष्क्रिय असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वी झालेल्या चोरीप्रकरणात पोलिसांना चोरांचा माग काढता आला नव्हता. अखेर गावकऱ्यांनीच चोर पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला होता. मात्र संबंधित आरोपी काही दिवसांतच जामिनावर सुटल्याने चोरट्यांचे मनोबल वाढल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. “चोर पकडायचा आणि पुन्हा सोडून द्यायचा” हा प्रकार थांबला नाही तर भविष्यात नागरिकांना घरात राहणेही कठीण होईल, अशी तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
या भुरट्या चोऱ्यांमुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे.

आधीच कर्जाच्या डोंगराखाली दबलेल्या शेतकऱ्यांच्या उरावर आता केबल चोरीचे संकट बसले आहे. लाखो रुपयांच्या केबल आणि मोटारी आतापर्यंत चोरीला गेल्या असून प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

पश्चिम भागात सुरू असलेला हा “चोर-पोलिस” खेळ थांबवण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी स्वतः लक्ष घालून कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. धरण परिसरातील गावांमध्ये रात्री गस्त वाढवणे, संशयित टोळ्यांवर नजर ठेवणे आणि पकडलेल्या आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

उन्हाळ्यात पाण्यासाठी लोकांचे प्रचंड हाल होत असताना मोटार व केबल चोरी करणाऱ्या चोरट्यांवर तातडीने लगाम घालावा, अन्यथा नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पश्चिम भागातील ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनाला थेट इशारा देत, “कडक कारवाई करा, अन्यथा जनआंदोलन उभारू,” असा इशारा दिला आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!