NEET मध्ये पुण्याच्या श्रावणी कुदळेचा तिहेरी पराक्रम; मुलींमध्ये देशात प्रथम, महाराष्ट्रात अव्वल!
![]()
बारामतीच्या कन्येने 710 गुणांसह देशात पाचवा क्रमांक; पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश, ग्रामीण भागासाठी ठरली प्रेरणादायी
पुणे | प्रतिनिधी : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने जाहीर केलेल्या NEET-UG परीक्षेच्या निकालात पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील श्रावणी कुदळे हिने उल्लेखनीय यश संपादन करत तिहेरी विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. श्रावणीने 720 पैकी 710 गुण मिळवत देशात पाचवा क्रमांक पटकावला असून, मुलींमध्ये देशात प्रथम आणि महाराष्ट्रातही प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान पटकावला आहे. तिच्या या यशामुळे बारामतीच्या शैक्षणिक इतिहासातही नव्या विक्रमाची नोंद झाली आहे.
NEET-UG 2026 मध्ये पंजाबचा आर्यन गुप्ता आणि हरियाणाचा पानशुल बन्सल यांनी 720 पैकी 715 गुण मिळवत संयुक्तपणे देशात अव्वल स्थान मिळवले. त्यानंतर महाराष्ट्रातून सर्वाधिक यश मिळवत श्रावणी कुदळेने राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला.
श्रावणीने पहिल्याच प्रयत्नात हे यश संपादन केले. तिला बायोलॉजीमध्ये 360 पैकी 360 गुण, केमिस्ट्रीमध्ये 180 पैकी 175 आणि फिजिक्समध्ये 180 पैकी 175 गुण मिळाले. कॉलेज आणि क्लासेस वगळता दररोज सुमारे सहा तास अभ्यास करून हे यश मिळवल्याचे तिने सांगितले.
श्रावणीचे वडील कृष्णा कुदळे आणि आई जयश्री कुदळे हे दोघेही जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आहेत. मुलीने इतके मोठे यश मिळवेल, अशी अपेक्षा होती; मात्र तिने राष्ट्रीय स्तरावर झेप घेतल्याचा आम्हाला प्रचंड अभिमान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
परीक्षेच्या तयारीदरम्यान श्रावणीने मोबाईलचा वापर पूर्णपणे बंद ठेवला. दूरदर्शनपासूनही तिने स्वतःला दूर ठेवत संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केले. नियमित अभ्यास, सातत्य आणि आत्मविश्वास याच यशाच्या गुरुकिल्ल्या असल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले.
यशाचे रहस्य सांगताना श्रावणी म्हणाली, “यश हवे असेल तर सुरुवातीपासून सातत्याने अभ्यास करा. घाबरू नका, स्वतःवर विश्वास ठेवा आणि मेहनतीत कधीही खंड पडू देऊ नका.” ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तिचे हे यश प्रेरणादायी ठरत आहे.





















