Wed, Jul 22, 2026
सामाजिक

वंगचुक यांच्या समर्थनार्थ वाईकरांचे आत्मक्लेश आंदोलन; तहसील कार्यालयासमोर नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

वंगचुक यांच्या समर्थनार्थ वाईकरांचे आत्मक्लेश आंदोलन; तहसील कार्यालयासमोर नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
Ashok Ithape
  • PublishedJuly 22, 2026

वाई, प्रतिनिधी : लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ सोमवारी वाई तहसील कार्यालयासमोर विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील नागरिकांनी आत्मक्लेश आंदोलन करून निषेध व्यक्त केला. या आंदोलनात ज्येष्ठ नागरिक, तरुण, विद्यार्थी, पालक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.

मागील २३ दिवसांपासून दिल्ली येथे सोनम वांगचुक शांततापूर्ण आमरण उपोषण करत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन दवाखान्यात दाखल केल्याचा तसेच आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीमार झाल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ देशभर विविध ठिकाणी आंदोलन होत असून, त्याचाच एक भाग म्हणून वाई येथे आत्मक्लेश आंदोलन आयोजित करण्यात आले.

आंदोलनादरम्यान सहभागी नागरिकांनी हातात भारतीय संविधानाच्या प्रती तसेच विविध मागण्यांचे फलक घेऊन शांततेच्या मार्गाने आपला निषेध नोंदविला. यावेळी नीट, टीईटी आणि यावर्षी देशभरात घडलेल्या अन्य पेपरफुटीच्या घटना तसेच विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांबाबत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली.

तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत, शिक्षण क्षेत्रातील गंभीर प्रश्नांबाबत केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

या आंदोलनात ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ नीरज हातेकर, लेखक-दिग्दर्शक तेजपाल वाघ, दिग्दर्शक अमित बोबडे, रीलस्टार रसिका खंडागळे, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड, शहराध्यक्ष डॉ. सतीश बाबर, प्रमोद भिसे, दिलीप डोंबिवलीकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील नागरिक सहभागी झाले होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी तरुण पिढीने केवळ सोशल मीडियावर समर्थन व्यक्त करण्यापुरते मर्यादित न राहता लोकशाही मार्गाने प्रत्यक्ष सामाजिक प्रश्नांवर आपली भूमिका मांडण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन केले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!