Sat, Sep 5, 2026
पर्यावरण

जलसंधारणातून शाश्वत भविष्यासाठी सातारा जिल्ह्यात लोकचळवळीला बळ

जलसंधारणातून शाश्वत भविष्यासाठी सातारा जिल्ह्यात लोकचळवळीला बळ
Ashok Ithape
  • PublishedAugust 18, 2026

पाणी अडवा, पाणी जिरवा’चा संदेश घराघरात पोहोचविण्यासाठी जलसंधारण सप्ताह; २१ ऑगस्टला ‘वॉक फॉर वॉटर

सातारा, दि. १७ : माती आणि पाण्याचे संवर्धन ही केवळ पर्यावरणाची गरज नसून शेती, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि भावी पिढ्यांच्या सुरक्षित भवितव्याची मूलभूत गरज आहे. याच उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने १५ ते २१ ऑगस्टदरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ आणि २१ ऑगस्ट रोजी ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात येणार आहे. या माध्यमातून सातारा जिल्ह्यातही जलसंधारणाचा संदेश व्यापक लोकचळवळीत रूपांतरित करण्यासाठी विविध उपक्रमांना चालना मिळणार आहे.
राज्यातील अनेक भागांमध्ये भूजल पातळी घटत असून भविष्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय म्हणून केवळ मोठ्या धरणांवर अवलंबून न राहता पाणलोट विकास, भूजल पुनर्भरण आणि स्थानिक पातळीवरील जलसंधारण उपाययोजनांना महत्त्व देण्याची गरज शासनाने अधोरेखित केली आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा मूलमंत्र देत जलसंधारणाची चळवळ उभी करणारे माजी मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक यांच्या जलसंधारण क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांचा जन्मदिन २१ ऑगस्ट हा ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जलसंधारणासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा

जलसंधारण ही केवळ शासकीय योजनांची जबाबदारी न राहता ग्रामीण आणि शहरी नागरिक, शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी तसेच विविध सामाजिक घटकांच्या सहभागातून व्यापक जनचळवळ उभी राहणे आवश्यक आहे. याच भूमिकेतून ‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ हा संदेश देत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात २१ ऑगस्ट रोजी ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ आयोजित करण्यात येणार आहे. तसेच जलसंधारण सप्ताहादरम्यान ‘मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धे’चे आयोजन करण्यात येणार आहे.

सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून जलसंधारणाचा संदेश अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. पावसाचे पाणी अडवणे, जमिनीत मुरवणे, भूजल पुनर्भरणाला चालना देणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे या बाबींची जनजागृती करण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.

विद्यार्थ्यांच्या सहभागातून भविष्यातील जलयोद्धे घडणार

आजची मुले ही उद्याचे भविष्य असल्याने विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यावर शासनाने विशेष भर दिला आहे. इयत्ता ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ तसेच ‘मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेत’ सहभागी करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग या उपक्रमांना केवळ एकदिवसीय कार्यक्रम न ठेवता दीर्घकालीन जलसंधारण लोकचळवळीचे प्रभावी माध्यम बनवू शकतो. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जलसंधारणाचा संदेश कुटुंबापासून गावापर्यंत आणि गावापासून संपूर्ण समाजापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.

पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा

जलसंधारणासाठी शासनाच्या प्रयत्नांना नागरिकांच्या सक्रिय सहभागाची जोड मिळाल्यास भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी निश्चितच सकारात्मक परिणाम साधता येतील. माती आणि पाणी ही परस्परावलंबी नैसर्गिक संसाधने असून त्यांचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे.

त्यामुळे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी सातारा जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, महिला, युवक आणि सामाजिक संस्थांनी जलसंधारण सप्ताह व जलसंधारण दिनाच्या उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे. लोकसहभागातून उभी राहणारी ही जलसंधारणाची चळवळ सातारा जिल्ह्याच्या शाश्वत आणि जलसुरक्षित भवितव्याचा मजबूत पाया ठरू शकते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!