“यशाचे शिखर गाठायचे असेल तर कष्ट आणि संस्कारांची जोड आवश्यक” – संतोष शेलार
![]()
कलासागर अकॅडमीच्या वार्षिक गुणगौरव सोहळ्यात विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन; राज्यात प्रथम आलेल्या स्वामी क्षीरसागरचा गौरव
वाई, प्रतिनिधी : जीवनात मोठे यश संपादन करून उच्च ध्येय गाठायचे असेल तर कष्टाला कोणताही पर्याय नाही. शिक्षणाबरोबरच संस्कारांनाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे. आपण कितीही यशस्वी झालो तरी आई-वडिलांचे ऋण कधीही विसरू नये. अशा विद्यार्थ्यांचे भविष्य निश्चितच उज्ज्वल असते, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम (राष्ट्रीय महामार्ग) विभागाचे सचिव संतोष शेलार यांनी केले.
येथील कलासागर अकॅडमीच्या वार्षिक गुणगौरव सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध कवी व वक्ते प्रा. संदीप जगताप, प्रा. लहुराज पांढरे, प्रा. हेमंत काळोखे, प्रा. रुपाली शिंदे, संजय वाईकर, डॉ. चंद्रकांत कांबळे, चंद्रकांत सावंत, विकास घोणे, संजय जाधव, सरोजकुमार मिठारी, डॉ. दत्ता घोलप, अरुण आदलिंगे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. हेमंत काळोखे यांनी केले. प्रा. लहुराज पांढरे यांनी उपस्थितांचे स्वागत व मान्यवरांचा सत्कार केला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सितेश कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमास अॅकॅडमीचे पालक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रसिद्ध कवी व वक्ते प्रा. संदीप जगताप म्हणाले, “मराठी विद्यार्थ्यांनी केवळ नोकरी मिळविण्यासाठी नव्हे, तर उद्योजक, शास्त्रज्ञ आणि विविध क्षेत्रांतील यशस्वी व्यक्तिमत्त्व बनण्यासाठी शिक्षण घ्यावे. जीवनाचा मार्ग स्वतः निवडण्याची तयारी ठेवली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत पालकांइतकाच शिक्षकांचाही महत्त्वपूर्ण वाटा असतो.
फोटो ओळी : महाराष्ट्रात १०० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावलेल्या स्वामी क्षीरसागरचा गुणगौरव करताना महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम (राष्ट्रीय महामार्ग) विभागाचे सचिव संतोष शेलार, प्रा. संदीप जगताप, प्रा. लहुराज पांढरे, शिवाजी चव्हाण, अरुण आदलिंगे व अन्य मान्यवर





















