Fri, Apr 17, 2026
प्रशासन सातारा जिल्हा

पुढील वर्षातील संभाव्य टंचाई लक्षात घेता आत्तापासूनच उपाय योजना सुरु करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुढील वर्षातील संभाव्य टंचाई लक्षात घेता आत्तापासूनच उपाय योजना सुरु करा –  जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
Ashok Ithape
  • PublishedSeptember 29, 2023

सातारा दि.29 (जिमाका) :

पुढील वर्षातील संभाव्य टंचाई लक्षात घेऊन पिण्यासाठी पाणी, जनावरांसाठी चारा, पाटबंधारेच्या प्रकल्पांची दुरुस्ती यासह  टंचाई संदर्भातील सर्व बाबींचा आराखडा तयार करुन आत्तापासूनच उपाययोजना सुरु करा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात टंचाई आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. डुडी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी उपवनसंरक्षक आदिती भारद्वाजत, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्याकरी अधिकारी महादेव घुले, उपजिल्हाधिकारी (रोहयो)   विजया पाटील,जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

टंचाई आराखड्यामध्ये सर्व गावांमध्ये पिण्याचे पाणी पोहचले पाहिजे असे नियोजन करा, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, जिल्ह्यात  पशुधनाला  मार्च पर्यंत पुरेल एवढा चारा उपलब्ध आहे.  जुलै 2024 पर्यंत चाऱ्याचे नियोजन करा. यासाठी कृषि विभागाने गावांमधीली जमिनी  शोधण्याबरोबरच  शेतकऱ्यांनाही चारा उत्पादन करण्यासाठी प्रवृत्त करुन चारा लागवडीचे प्रमाण वाढवावे. यासाठी कृषि विभागाने शेतकऱ्यांना सर्व सहकार्य करावे. निधीही उपलब्ध करुन दिला जाईल. या कामासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घ्यावी.

प्रत्येक गावामध्ये लोकसहभागातून कमीत कमी 10 वनराई बंधारे बांधावेत. बंधाऱ्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास खूप मदत होते. याकामासाठी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी व स्वयंवेसवकांची मदत घ्यावी. वनराई बंधाऱ्याबाबत सरपंच, उपसरपंच यांच्यासाठी ऑनलाई कार्यशाळेचे आयोजन करावे. वनराई बंधारे उभारणीसाठी बांधकाम विभागाची मदत घ्यावी.

जिल्ह्यात सुरु असलेली जल जीवन मिशनची कामेही मिशनमोड पूर्ण करावी. यामुळे पिण्याच्या पाण्याची अडचण कमी होईल. जलयुक्त शिवार 2.0 अंतर्गत 186 गावांमध्ये काम करण्यात येणार आहे. या कामांची प्रशासकीय मान्यता लवकरात लवकर घेऊन ही कामे सुरु करावीत.  गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत कोयना धरणातील पाणी जस जसे कमी होईल तस तसा गाळ काढण्याचे काम सुरु करावे. जिल्ह्यातील नदी-नाल्यांमधील गाळ काढण्याचे नियोजनही करावे. यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत टंचाई संदर्भात जी कामे सुरु आहेत ती ही कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत.

विभागांनी बांबु लागवडीचे उद्ष्टि पूर्ण करावे
27 हजार हेक्टरवर बांबु लागवडीचे  उद्दिष्ट देण्यात आले आहे. या नुसार विभागांनी लागवडीचे प्रस्ताव लवकरात लवकर मंजुर करुन प्रशासकीय मान्यता घेऊन प्रत्यक्ष बांबु लागवडीचे काम सुरु करावे.  लागवडीसाठी वृक्ष गावापर्यंत पोहविण्यात येतील. ऑक्टोंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात बांबु लागवड होईल या दृष्टीने काम करावे. यबाबात वेळोवेळी आढावाही घेतला जाईल, असेही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी सांगितले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!