एल निनोच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सीआरए तंत्रज्ञानाचा अवलंब करावा : भाग्यश्री फरांदे
![]()
वाई तालुक्यातील आंबा लागवड, फळबाग व कृषी प्रक्रिया उद्योगांची पाहणी; आधुनिक व शाश्वत शेतीसाठी कृषी विभागाचे मार्गदर्शन
वाई, प्रतिनिधी : बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आणि एल निनोच्या संभाव्य परिणामांचा विचार करता शेतकऱ्यांनी हवामानाशी जुळवून घेणारे सीआरए (Climate Resilient Agriculture) तंत्रज्ञान अधिकाधिक वापरावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी वाई तालुक्यातील विविध कृषी प्रकल्पांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला तसेच आधुनिक शेतीविषयक मार्गदर्शन केले.
दौऱ्यादरम्यान कुसगाव (ता. वाई) येथील शेतकरी संजीव वरे यांच्या आंबा लागवडीची पाहणी करण्यात आली. तसेच बदलत्या हवामानाशी जुळवून घेत शेतीचे उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सीआरए तंत्रज्ञानाअंतर्गत करण्यात आलेल्या कामांची माहिती त्यांनी घेतली.
त्यानंतर पसरणी येथील प्रगतशील शेतकरी सुनील महांगडे यांच्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या फळबागेला भेट देण्यात आली. तसेच PMFME योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या मसाला प्रक्रिया उद्योगाचीही पाहणी करण्यात आली.
यावेळी भाग्यश्री फरांदे यांनी कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, मूल्यवर्धन, कृषी प्रक्रिया उद्योग आणि शाश्वत शेतीचे महत्त्व याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषी विभागामार्फत वाई तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी समाधानकारक असून तालुक्यातील कामकाज उत्कृष्ट पद्धतीने सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळून आधुनिक, तंत्रज्ञानाधारित व शाश्वत शेतीला चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी तालुका कृषी अधिकारी हरीशचंद्र धुमाळ, मंडळ कृषी अधिकारी रवींद्र बेलदार, उपकृषी अधिकारी किरण बाबर, निखिल मोरे, सहाय्यक कृषी अधिकारी सचिन जगताप, प्रवीण नाळे, प्रगतशील शेतकरी सुनील महांगडे, तंटामुक्ती अध्यक्ष सदाशिव वरे, राजश्री वरे, शिवराज वरे आदी उपस्थित होते.
फोटो कॅप्शन : सीआरए तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित करण्यात आलेल्या आंबा लागवडीची माहिती घेताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, शेतकरी संजीव वरे व कृषी विभागाचे अधिकारी.





















