Sat, Jun 13, 2026
Close

Recent Posts

यशोगाथा

‘अजिंक्यकन्या’ धैर्याची धुरंधर कामगिरी!

‘अजिंक्यकन्या’ धैर्याची धुरंधर कामगिरी!
Ashok Ithape
  • PublishedJune 9, 2026

रचले नवे रेकॉर्ड; प्रतिकुलतेतही युनाम शिखर केले सर

सातारा / प्रतिनिधी : सर केले, एव्हरेस्ट बेस कॅम्प… किलीमंजारो… माऊंट एलब्रुस… आता युनाम शिखर… ही कामगिरी म्हणजे ‘धैर्यं सर्वेषु कालेषु आवश्यकम’ अशीच. फक्त नावानेच काही तर कर्तबगारीने धैर्य दाखल सातारची ‘अजिंक्यकन्या’ धैर्या ज्योती विनोद कुलकर्णी हिने शिखर सर करण्याची धुरंधर कामगिरी केली आहे. एकाधिक शिखर सर करणारी अवघ्या १४ वर्षांची धैर्या आता या गिर्यारोहण क्षेत्रात निष्णात, कुशल, प्रवीण म्हणजे धुरंधर बनत आहे.

साताऱ्याचे नाव गिर्यारोहण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकवणाऱ्या धैर्याचा सातारकरांना अभिमान वाटावा, अशीच कामगिरी आहे. बालपणात डोंगर, कपारी, शिखरे चढण्याची आवड निर्माण झालेल्या धैर्याचा प्रवास थक्क करणारा असाच आहे. वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी धैर्याने आव्हानात्मक असलेल्या एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करण्याचा विडा उचलला आहे. ही मोहिम सर करताना प्रचंड शारीरिक बदलाना तिला सामोरे जावे लागले. त्या वेदना एक महिला, युवतीच समजू शकते. तरीही त्या वेदना ‘पोटात’ घेवून धैर्याने ५ हजार ५४५ मीटर इतकी उंची गाठत एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहिम यशस्वी पार केली. पालकांशिवाय ही मोहिम फत्ते करणारी बहुदा देशातील ती एकमेव अल्पवयीन मुलगी ठरली.

धैर्या येथेच थांबली नाही, ती पुन्हा झेपावली आणि आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर किलीमंजारो सर केले. तब्बल ५ हजार ८५० मीटर इतकी उंची असलेले शिखर तिने अनेक आव्हानांवर मात करत सर केले. उणे ५ ते ६ अंश सेल्सिअस तापमान, बर्फ, थंडी, ऑक्सिजन कमी, रात्रीचा प्रवास अशा स्थितीत हे शिखर तिने चढले.

दोन शिखरे सर करुन थांबेल ती धैर्या कसली! कॉकेशस पर्वत रांगेत असलेल्या युरोप खंडातील सर्वोच्च असे शिखर माऊंट अल्ब्रुस हेही शिखर सर केले. ५ हजार ६४२ मीटर उंचीचे शिखर तिने काही महिन्यांपूर्वी सर केले. जागतिक स्तरावर युध्दाचे परिणाम पाहण्यास मिळत असल्याने परदेशातील शिखर सर करण्याची मोहिम राबवणे सध्या जिकीरीचे बनले आहे. म्हणून धैर्याने यातही न थांबता भारतातील शिखरे सर करण्याचा चंग बांधला आहे. गत महिन्यात तिने हिमाचल प्रदेशातील फ्रेंडशीप शिखर सर करण्यासाठी धैर्या सरसावली. ५ हजार २८९ मीटर म्हणजेच १७ हजार ३५२ फूट उंचीचे हे शिखर. अवघे ३०० ते ४०० मीटर अंतर शिखर चढण्यासाठी उरले होते. परंतु, खराब हवामान आणि प्रचं बर्फवृष्टीमुळे तिला हे शिखर सर करताना आले नाही.

त्या मोहिमेतून मनाशी खूणगाठ बांधत लगेचच फ्रेंडशीप शिखरापेक्षाही मोठे आणि आव्हानात्मक असलेले शिखर युनाम शिखर सर करण्याचे धाडस तिने दाखवले. तब्बल ६ हजार १११ मीटर म्हणजेच २० हजार ४९ फूट इतक्या उंचीचे शिखर तिने नुकतेच सर केले. दि. २२ मे रोजी ही मोहिम सुरु करत तिने दि. ५ जूनपर्यंत ही मोहिम पूर्णत्वाला नेली. गिर्याराहण क्षेत्रात धैर्याची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. हिमाचल प्रदेशातील पीर पंजाल पर्वत रांगेत, मनालीपासून पुढे आणि बारालाचा ला खिंडीजवळ युनाम शिखर आहे. ६ हजार मीटरपेक्षा उंच असलेले हे शिखर सर करणे हे तांत्रिक कौशल्याधिष्ठित आहे. गिर्यारोहकांसाठी हे लोकप्रिय शिखर आहे.

धैर्याने आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक डॉ. हेमंत लिऊआ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रेरणेमुळे युनाम शिखर सर केले. डॉ सुरभी लिऊआ यांनी धैर्याला फ्रेंडशिप शिखर सर करण्यासाठी अथक प्रयत्न केले. गेली सहा वर्षे सातत्याने ट्रेकिंग आणि गिर्यारोहणाचा सराव करत असलेल्या धैर्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. धैर्याला प्रियांका मोहिते, कैलास बागल आणि डॉ. शीतल बेबी यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभले. धैर्याने साताऱ्यातील गुरुकुल शाळेत इयत्ता नववीत प्रवेश केलेला आहे.

सातारा जनता सहकारी बँकेचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी आणि शिक्षिका सौ. ज्योती कुलकर्णी यांची ती कन्या आहे. अल्पवयात सातत्याने जागतिक स्तरावरील शिखरे सर करत धैर्या कुलकर्णी साताऱ्याच्या नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान बनली आहे.

धैर्याने सर केलेली शिखरे…
एव्हरेस्ट बेस कॅम्प
किलीमंजारो
माऊंट एलब्रुस
कळसूबाई
गिरनार
सह्याद्रीतील अनेक गडकिल्ले
नर्मदा उत्तरवाहिनी परिक्रमा

आसमान तलक रास्ता बनाना है…!

अपयशाने खचून जाणे सोपे असते, पण त्याच अपयशाला यशाच्या पायरीत रूपांतरित करणे हे खऱ्या जिद्दीचे लक्षण असते. फ्रेंडशिप पीक मोहिमेत शिखर अवघ्या ३०० ते ४०० मीटर अंतरावर असताना खराब हवामानामुळे धैर्याला माघार घ्यावी लागली. शिखर डोळयासमोर असूनही ते सर करता न आल्याची खंत तिच्या मनात होती. मात्र, तिने त्या वेदनेला निराशेचे रूप न देता नव्या उमेदीत बदलले. थांबायचे नाही, आणखी उंच भरारी घ्यायची, हा निर्धार मनाशी बाळगत धैर्याने अधिक कठीण आणि अधिक उंच अशा ६१११ मीटर उंच युनाम शिखरावर यशस्वी चढाई केली. फ्रेंडशिप पीकवरील अपूर्ण स्वप्नानेच तिला युनामच्या शिखरापर्यंत पोहोचण्याची ताकद दिली. फ्रेंड शिप शिखर १७ हजार फूट आणि लगेच यु नाम २० हजार ४९ फूट एकाच दिवसाच्या फरकाने बॅक टू बॅक आव्हानात्मक चढाई करणे धैर्याची ही कामगिरी केवळ शिखर सर करण्यापुरती मर्यादित नाही, तर अपयशावर मात करून स्वप्नांना नवी दिशा देणाऱ्या जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाची प्रेरणादायी कहाणी ठरली आहे.

प्रतिक्रिया –
पोटच्या गोळयाला आकार देण्याचे कर्तव्य आम्ही करत आहोत, तर आई-बाबांनी दिलेले नाव सार्थक करण्याचे कर्तव्य ती पार पाडत आहे. आता केवळ विनोद आणि ज्योती कुलकर्णी यांची कन्या अशी ओळख नाही तर तिने स्वत:ची ओळख अजिंक्यकन्या, शिखरकन्या अशी निर्माण केली आहे. ‘धरासे चढकर गगन को छुआ…’ अशी धैर्याची कामगिरी असून, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया धैर्याचे वडील विनोद, आई सौ. ज्योती कुलकर्णी यांनी दिली.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!