Mon, Mar 2, 2026
प्रशासन

तलाठी कार्यालयात नागरिकांची सनद उपलब्ध अमित सूर्यवंशी यांच्या मागणीला तहसील कार्यालयाचा प्रतिसाद

तलाठी कार्यालयात नागरिकांची सनद उपलब्ध अमित सूर्यवंशी यांच्या मागणीला तहसील कार्यालयाचा प्रतिसाद
Ashok Ithape
  • PublishedJanuary 11, 2024

भुईंज : माहिती अधिकार अभियानातील कार्यकर्ते अमित सूर्यवंशी यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश येवून सर्व तलाठी कार्यालयांमध्ये नागरिकांची सनद उपलब्ध करण्याच्या सूचना वाई तहसिल कार्यालयामार्फत देण्यात आल्या असून त्याची सर्वप्रथम अंमलबजावणी भुईंज येथील तलाठी कार्यालयात करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, कीशासकीय कार्यालयात शासकीय कर्मचार्‍यांच्या हक्कांबाबत, त्यांच्या सुरक्षेच्या कायद्याबाबतचे फलक दर्शनी भागात लावलेले असतात. मात्र अनेक ठिकाणी नागरिकांच्या हक्क, अधिकारांबाबत माहिती देणारे फलक लावलेले दिसून येत नाहीत. त्यामुळे माहिती अधिकार अभियानाचे कार्यकर्ते अमित सूर्यवंशी यांनी माहितीच्या अधिकाराबाबत हा मुद्दा उपस्थित करुन तलाठी कार्यालयांमध्ये नागरिकांचे हक्क, अधिकार याबाबतची माहिती देणारी सनद प्रसिद्ध करण्याची विनंती केली होती.

नागरिकांची विविध कामे नेमक्या किती कालावधीत होणे बंधनकारक आहे यापासून त्याचे शासकीय मूल्य तसेच कर्मचार्‍यांची कर्तव्ये याची माहिती जनतेला होणे आवश्यक असल्याचे सांगून त्यांनी नागरिकांची सनद प्रसिद्ध करण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्याला वाई तहसिल कार्यालयाने प्रतिसाद देवून सर्व तलाठी कार्यालयांना याबाबतच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार भुईंज तलाठी कार्यालयात तलाठी मोहन जाधव यांनी सर्वप्रथम अंमलबजावणी केली आहे. याबद्दल अमित सूर्यवंशी यांनी समाधान व्यक्‍त करुन तलाठी जाधव यांचे अभिनंदन केले. दरम्यान, अमित सूर्यवंशी यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश येवून नागरिकांची सनद उपलब्ध झाल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .

माहितीचा अधिकार जनतेचा हक्क

अमित सूर्यवंशी यांनी यापूर्वीही माहितीच्या अधिकारातून जनतेच्या हक्कांसाठी पाठपुरावा केला आहे. त्यांच्या प्रयत्नातून विविध शासकीय कार्यालयातील कायद्याचा अधिकार नसलेले फलक हटले गेले असून नागरिकांचे हक्क अधिकार व हित दर्शवणारे फलक आता लागू लागले आहेत.

सूर्यवंशी व त्यांच्या सहकार्‍यांनी माहितीच्या अधिकारातून विविध घोटाळेही उघड केले असून त्यांच्या या निरपेक्ष व जनहिताच्या कामातून जनतेला त्यांचे हक्क प्राप्त होत असल्याची भावना परिसरात आहे. माहितीचा अधिकार हा जनतेचा हक्क असून तो मोठ्या लढ्यानंतर जनतेला प्राप्त झाला आहे. जो योग्य, प्रामाणिक व भ्रष्टाचार विरहित काम करतो त्याच्याकडून या कायद्याचा नेहमीच आदर केला जात असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!