Sat, Sep 5, 2026
क्रीडा

किसन वीर महाविद्यालयाचा बॅडमिंटनमध्ये पुन्हा दबदबा!

किसन वीर महाविद्यालयाचा बॅडमिंटनमध्ये पुन्हा दबदबा!
Ashok Ithape
  • PublishedSeptember 5, 2026

किसन वीर महाविद्यालयाच्या पुरुष बॅडमिंटन संघाने दमदार कामगिरी करत सातारा विभागीय विजेतेपदावर सलग दुसऱ्यांदा नाव कोरले. १६ संघांच्या स्पर्धेत अव्वल ठरत महाविद्यालयाने आपले वर्चस्व कायम राखले.

पुरुष संघाचे सलग दुसऱ्यांदा सातारा विभागीय विजेतेपद; १६ संघांमध्ये ठरला अव्वल

वाई, दि. ५ सप्टेंबर २०२६ : जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालय, वाईच्या पुरुष बॅडमिंटन संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सातारा झोनल बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. या शानदार कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

सातारा येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील एकूण १६ संघांनी सहभाग घेतला होता. या सर्व संघांना मागे टाकत किसन वीर महाविद्यालयाच्या संघाने दमदार कामगिरी केली आणि प्रथम क्रमांक पटकावत सातारा झोनल चॅम्पियनशिपवर आपले नाव कोरले.

विजयानंतर किसन वीर महाविद्यालयाच्या विजयी बॅडमिंटन संघातील खेळाडू तसेच संघाला मार्गदर्शन करणारे मेजर डॉ. समीर पवार यांचा सत्कार करण्यात आला.

विजयी संघाचे नेतृत्व अथर्व कर्णे याने केले. संघात कृष्णा जाधव, आदित्य हराळे, आनंद राजपूरे, प्रथमेश साळुंखे आणि सिद्धार्थ मुंगसे या खेळाडूंचा समावेश होता. सातत्यपूर्ण सराव, कठोर मेहनत, उत्कृष्ट सांघिक समन्वय आणि जिद्दीच्या जोरावर खेळाडूंनी हे उल्लेखनीय यश संपादन केले.

या यशाबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले, उपाध्यक्ष शंकरराव गाढवे, सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार नारायणराव चौधरी, सर्व संचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य प्रा. डॉ. विनोद वीर, प्राध्यापकवर्ग व कर्मचारी यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले.

दरम्यान, आगामी शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी महाविद्यालयाच्या संघाला सर्वांनी शुभेच्छा दिल्या. सलग दुसऱ्यांदा मिळवलेल्या या विजेतेपदामुळे किसन वीर महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील सातत्यपूर्ण कामगिरीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!