भाग्यश्री थोरवे ठरल्या पश्चिम भागातील पहिल्या महिला पोलीस अधिकारी
![]()
शेतकरी कन्येची जिद्द, चिकाटी आणि मेहनतीला यशाचे पंख; महाराष्ट्र पोलीस अकादमीतील खडतर प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण
वाई, दि. ११ : वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील व्याहळी कॉलनी येथील शेतकरी कुटुंबातील कन्या भाग्यश्री विद्या विजय थोरवे यांनी पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठीचे एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून पश्चिम भागाच्या इतिहासात मानाचा तुरा रोवला आहे. त्या या भागातील पहिल्या महिला पोलीस अधिकारी बनल्या असून त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे संपूर्ण वाई तालुक्यात अभिमान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे पार पडलेल्या दीक्षांत संचलन सोहळ्यात त्यांनी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. या सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी नव्या पोलीस अधिकाऱ्यांना कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि जनसेवेची भावना जपण्याचा संदेश दिला.
अत्यंत साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या भाग्यश्री यांच्या वडिलांचे नाव विजय थोरवे तर आईचे नाव विद्या थोरवे असून, त्यांच्या कष्ट आणि पाठिंब्यामुळेच हे यश शक्य झाल्याचे भाग्यश्री यांनी सांगितले. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, व्याहळी कॉलनी येथे, माध्यमिक शिक्षण द्रविड हायस्कूल, वाई येथे तसेच बी.कॉम. पदवी किसनवीर महाविद्यालय, वाई येथून पूर्ण झाली. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एम.कॉम. पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले आहे.
एमपीएससी २०२२ परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक आणि महसूल सहाय्यक २०२३ पदासाठी निवड मिळवत त्यांनी आपल्या गुणवत्तेची छाप पाडली. प्रशिक्षण काळात शारीरिक क्षमता, शस्त्र हाताळणी, गुन्हे अन्वेषण, कायदा व सुव्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन आणि नेतृत्व कौशल्य या क्षेत्रांत त्यांनी प्राविण्य मिळवले.
भाग्यश्री यांचा धाकटा भाऊ भारतीय सैन्य दलात देशसेवा बजावत असून मोठा भाऊ स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. देशसेवा आणि कर्तव्यनिष्ठेची परंपरा जपणाऱ्या या कुटुंबाचा संपूर्ण परिसराला अभिमान आहे.
“शेतकरी कुटुंबातील मुलगी म्हणून पोलीस अधिकारी होण्याचा प्रवास सोपा नव्हता. आई-वडिलांचे कष्ट, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबाचा भक्कम पाठिंबा यामुळे हे यश मिळाले. समाजाच्या सुरक्षिततेसाठी आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणे हेच माझे ध्येय आहे,” असे भाग्यश्री थोरवे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले.
भाग्यश्री थोरवे यांचे यश हे ग्रामीण भागातील मुलींसाठी प्रेरणादायी ठरले असून शिक्षण, जिद्द आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, याचा त्यांनी आदर्श घालून दिला आहे.





















