जागतिक सायकल दिनानिमित्त हेमंत ढवळे यांचा १६० कि.मी. सायकल प्रवास
![]()
पर्यावरण संवर्धन, आरोग्य जागरूकता आणि सायकल संस्कृतीचा संदेश; वाई ते श्री क्षेत्र मयूरेश्वर असा प्रेरणादायी उपक्रम
वाई, प्रतिनिधी : जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून सायकलप्रेमी हेमंत सीताराम ढवळे यांनी वाई ते श्री क्षेत्र मयूरेश्वर असा तब्बल १६० किलोमीटरचा सायकल प्रवास पूर्ण करून पर्यावरण संवर्धन, निरोगी जीवनशैली आणि सायकल संस्कृतीचा प्रभावी संदेश दिला. संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने पहाटे वाई येथील महागणपती घाटावरून त्यांनी प्रवासास सुरुवात केली.
प्रवासादरम्यान विविध ठिकाणी त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. नीरा येथे समर्थ पतसंस्थेचे चेअरमन राजोजे चव्हाण, डॉ. श्रेणिक शाह तसेच आयडियल कराटेचे संजय सोनवणे व अजित सोनवणे यांनी त्यांचा सत्कार केला. पांडेगाव येथील ग्रामस्थ आणि विविध संस्थांनीही त्यांचे स्वागत करून उपक्रमाचे कौतुक केले.
श्री क्षेत्र मयूरेश्वर येथे दर्शन घेतल्यानंतर पुढील प्रवासास सुरुवात करत त्यांनी सायकलिंगच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश दिला. कोरेगाव सायकल ग्रुप तसेच माजी नगरसेवक महेंद्र पवार आणि मित्रपरिवारानेही त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी हेमंत ढवळे म्हणाले, “सायकल हे केवळ वाहतुकीचे साधन नसून आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचे प्रभावी माध्यम आहे. प्रदूषणमुक्त वाहतूक आणि नियमित व्यायामासाठी सायकलचा वापर वाढविणे ही काळाची गरज आहे.”
त्यांच्या या अभिनव उपक्रमाचे सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक केले. सायकलिंगच्या माध्यमातून पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देणारा हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
फोटो ओळ : जागतिक सायकल दिनानिमित्त १६० कि.मी. सायकल प्रवास पूर्ण केल्यानंतर सायकलप्रेमी हेमंत ढवळे यांचा विविध मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला. (छाया : शिवाजी निकम)





















