Wed, Jul 22, 2026
सातारा जिल्हा

पाणी व स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी

पाणी व स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी
Ashok Ithape
  • PublishedMay 27, 2026

सहा महिन्यांपासून वेतन रखडल्याने आंदोलनाचा इशारा; जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांना निवेदन

सातारा l प्रतिनिधी, दि. २६ : पाणी व स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांचे गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित असलेले वेतन तातडीने मंजूर करून प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसंवर्धन केंद्र (पाणी व स्वच्छता) कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सौ. प्रिया शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रोहित जाधव, उपाध्यक्ष सौ. हेमा बडदे, सचिव फिरोज मुलाणी, अमित गायकवाड, एम. एम. पाटील, मनोज खेडेकर, प्रथमेश वायदंडे, संतोष जाधव, स्वाती नांदे, प्रियंका देशमुख आदी उपस्थित होते.

कर्मचाऱ्यांना डिसेंबर २०२५ पासून वेतन मिळाले नसल्याने त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. मुलांच्या शिक्षणाचा खर्च, घरभाडे, दैनंदिन गरजा भागवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, शासनाने तातडीने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

डॉ. प्रिया शिंदे यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनस्तरावर मांडून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास दि. १ जूनपासून जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन, दि. ५ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणि त्यानंतर कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!