ज्ञान, विचार आणि संस्कारांचा जागर; १६ व्या राज्यस्तरीय गावगाडा साहित्य पुरस्कारांचे वितरण उत्साहात
![]()
“मला सावित्रीची लेक म्हणवून घ्यायला अभिमान वाटतो” – अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह
वाई, दि. २६ : “पुस्तकांमधूनच माणसाला ज्ञान, विचार आणि जगण्याची नवी दिशा मिळते. गावगाडा साहित्य पुरस्कार हा केवळ साहित्यिकांचा गौरव करणारा नसून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींनाही सन्मानित करणारा उपक्रम आहे. त्यामुळे या पुरस्काराचे वेगळेपण अधिक उठून दिसते,” असे गौरवोद्गार अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांनी काढले.
सोलापूर जिल्ह्यातील वडशिव (ता. करमाळा) येथील विश्वकर्मा तरुण मंडळाच्या वतीने पुणे येथील अक्षरवेल सभागृहात आयोजित १६ व्या राज्यस्तरीय गावगाडा साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिनेते प्रा. डॉ. संजय चौधरी होते.
आपल्या भाषणात मोनिका सिंह यांनी क्रांतीज्योती Savitribai Phule यांच्या विचारांचा आपल्या जीवनावर खोल प्रभाव असल्याचे सांगितले. त्यांनी प्रभावी शब्दांत भावना व्यक्त करताना म्हटले,
“अंधेरे के साथ मैं दिन-रात लड़ती हूँ… माँ हूँ… अफसर हूँ… मैं सावित्री की बेटी हूँ…”
तसेच “मला सावित्रीची लेक म्हणवून घ्यायला अतिशय अभिमान वाटतो,” असेही त्या म्हणाल्या.
राज्यस्तरीय गावगाडा साहित्य पुरस्कारांचे वितरण अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह व प्रा. डॉ. संजय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावगाडा पुरस्कार समितीचे अध्यक्ष सोमनाथ टाकले, डॉ. जनार्दन भोसले, दत्तात्रय पिसाळ, बाबुराव इंगळे, रवींद्र रायकर, सोनाली गरुड आदी उपस्थित होते.
पुरस्कार प्राप्त साहित्यकृती
‘आकुबा आणि इतर कथा’ या आयु. विलास खरात यांच्या कथासंग्रहास तसेच ‘भालचंद्र नेमाडे : साहित्य विचार आणि कादंबऱ्या’ या डॉ. देवानंद सोनटक्के यांच्या समीक्षाग्रंथास “मातोश्री रत्नमाला बबन पिसाळ स्मृती पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
‘आतली कवाडं’ या कवी मिथुन चंद्र चौधरी यांच्या कवितासंग्रहास तसेच ‘पुसट सावल्या गडद काळ’ या कवयित्री संध्या लगड यांच्या कवितासंग्रहास “मातोश्री रुक्मिणी पांडुरंग भोसले स्मृती पुरस्कार” देण्यात आला.
‘पीळ’ या दिवाकर कृष्ण आचार्य यांच्या कादंबरीस, ‘नाथ मंदिरांतील दिवस’ या मुकुंदराज कुलकर्णी यांच्या ललित लेखनास तसेच ‘सणोत्सव’ या कवी विलास सिदंगीकर यांच्या बालकविता संग्रहास गौरविण्यात आले. तसेच लेखिका आशा नेगी, पुणे यांच्या ‘लव्ह इज लव्ह’ या कादंबरीलाही पुरस्कार प्रदान करण्यात आला.
“मातोश्री चांगुणाबाई सिद्राम इंगळे स्मृती पुरस्कार” प्रा. भास्कर बंगाळे, पंढरपूर यांच्या ‘आस्वाद साहित्याचा’ या समीक्षा ग्रंथास देण्यात आला. तसेच संपादन विभागातील पुरस्कार ‘सोलापूरची काव्यप्रभा’ या वंदना कुलकर्णी यांच्या ग्रंथास आणि ‘ढोर समाज आणि समाजाचे शिल्पकार’ या रमाकांत नारायणे, मुंबई यांच्या ग्रंथास विभागून देण्यात आला.
पुरस्काराचे स्वरूप शाल, स्मृतिचिन्ह, ग्रंथ व रोख रक्कम असे होते.
कार्यक्रमास योगीराज वाघमारे, सुहास घुमरे, प्रा. डॉ. मच्छिंद्र नांगरे, प्रा. डॉ. संतोष साळुंखे, श्रीकृष्ण जगदाळे, प्रा. हरिश्चंद्र साळुंके, प्रज्ञा दीक्षित, लक्ष्मण जगदाळे गुरुजी, राहुल खरात व त्यांची टीम उपस्थित होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी गझल सादरीकरण झाले. प्रास्ताविक सोमनाथ टाकले यांनी केले. सूत्रसंचालन सुहास घुमरे व स्मिता कुलकर्णी यांनी केले, तर आभार योगीराज वाघमारे यांनी मानले. महाराष्ट्रभरातून साहित्यिक, वाचक व पुरस्कारार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ : पुणे येथे आयोजित १६ व्या राज्यस्तरीय गावगाडा साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह, प्रा. डॉ. संजय चौधरी, गावगाडा पुरस्कार समितीचे अध्यक्ष सोमनाथ टाकले, प्रा. डॉ. जनार्दन भोसले व अन्य मान्यवर उपस्थित होते. (छाया : शाम फोटो स्टुडिओ, पुणे)





















