Thu, Apr 23, 2026
शिक्षण

गुणवत्ता मूल्यांकनात वाई तालुका जिल्ह्यात अव्वल

गुणवत्ता मूल्यांकनात वाई तालुका जिल्ह्यात अव्वल
Ashok Ithape
  • PublishedApril 23, 2026

एसक्यूएएफ प्रक्रियेत शाळांची उत्कृष्ट कामगिरी; शिक्षण विभागाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना यश

वाई, दि. २१ : शाळांच्या शैक्षणिक व भौतिक गुणवत्तेचे मूल्यमापन करणाऱ्या ‘शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा’ (एसक्यूएएफ) प्रक्रियेत वाई तालुक्याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. याबाबतची माहिती गट शिक्षणाधिकारी हर्षवर्धन मोरे यांनी दिली.

तालुक्यातील जिल्हा परिषद, प्राथमिक, माध्यमिक तसेच खाजगी शाळांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेत गुणवत्तापूर्ण माहिती राज्य शासनाकडे सादर केली. त्या आधारे झालेल्या गुणांकनात वाई तालुक्याने आघाडी घेत प्रथम क्रमांक मिळविला.

या मूल्यांकन प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पद्धतींचा सखोल आढावा घेऊन आवश्यक सुधारणा व उपाय सुचवले जातात. अध्यापन पद्धती, शालेय वातावरण, सुरक्षितता, पालकांचा सहभाग आणि शाळेतील नेतृत्व या घटकांमध्ये झालेल्या सुधारणांमुळे शैक्षणिक गुणवत्ता उंचावल्याचे दिसून आले.

तालुक्याच्या शिक्षण विभागाने राबविलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचा या यशात मोठा वाटा असून, या आराखड्यामुळे शिक्षकांना अध्यापनात सुधारणा करण्याची संधी मिळणार आहे. तसेच विद्यार्थीकेंद्रीत शिक्षणावर अधिक भर देता येणार आहे.

या यशाबद्दल मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, पंचायत समिती सभापती विक्रांत डोंगरे, उपसभापती वर्षा जगताप तसेच गट विकास अधिकारी नारायण घोलप यांनी तालुक्याचे अभिनंदन केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!