Thu, Apr 2, 2026
प्रशासन

वाई तालुक्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ला वेग; ग्रामपंचायती स्वच्छता मोहिमेसाठी सज्ज

वाई तालुक्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ला वेग; ग्रामपंचायती स्वच्छता मोहिमेसाठी सज्ज
Ashok Ithape
  • PublishedMarch 23, 2026

२४ मार्च रोजी विशेष स्वच्छता मोहीम; लोकसहभागातून ‘स्वच्छ गाव – निरोगी गाव’ संकल्प साकारण्यावर भर

वाई, प्रतिनिधी : वाई तालुक्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ अंतर्गत ग्रामपंचायतींनी व्यापक जनजागृती करत स्वच्छतेच्या चळवळीला गती दिली आहे. या अभियानाअंतर्गत दि. २४ मार्च २०२६ रोजी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून, गावागावांत लोकसहभागातून स्वच्छता आणि आरोग्य याबाबत जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्यमान उंचावणे, स्वच्छतेची सवय अंगीकारणे आणि ‘स्वच्छ गाव – सुंदर गाव’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणणे या उद्देशाने वाई विकास गटातील ग्रामपंचायतींनी नियोजनबद्ध तयारी सुरू केली आहे. ‘स्वच्छ भारत मिशन’च्या धर्तीवर ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यात स्वच्छतेच्या उपक्रमांमध्ये वाई तालुका नेहमीच अग्रेसर राहिलेला असून, या अभियानातूनही तोच आदर्श कायम ठेवण्याचा प्रयत्न आहे.

या मोहिमेअंतर्गत गावपातळीवर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. वृत्तपत्रे व इतर माध्यमांतून प्रचार-प्रसिद्धी करून नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्वच्छतेची शपथ घेत उपक्रमाचा शुभारंभ केला जाईल.

तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी, शासकीय कर्मचारी, अंगणवाडी व आशा सेविका, शिक्षक, बचतगट महिला, युवा मंडळे यांच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला भेट देऊन ओला व सुका कचरा वर्गीकरणाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. यासोबतच डस्टबिन वाटप, कचरा व्यवस्थापन, खत खड्डे व गांडूळखत प्रकल्पांचा वापर यावर विशेष भर दिला जाणार आहे.

‘खत खड्डा भरू, आपले गाव स्वच्छ करू’ या संकल्पनेतून ओला कचरा संकलित करून त्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खत निर्मिती केली जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्या जाणाऱ्या ‘ब्लॅक स्पॉट’ची स्वच्छता करून तेथे दंडात्मक कारवाईचे फलक व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची कार्यवाहीही केली जाणार आहे.
याशिवाय प्लास्टिक बंदी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करत प्लास्टिक वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. बाजारपेठा, बसस्थानके, शासकीय कार्यालये, धार्मिक स्थळे आदी ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबवून प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करण्यात येणार आहे.

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या निकषांनुसार ग्रामसभेत ठराव घेऊन स्पर्धेची तयारी करण्यात येणार असून, विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना (NGO) व सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभागही या मोहिमेत घेतला जाणार आहे.

या अभियानाला यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर आठवड्यातून किमान एक दिवस स्वच्छता उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तालुका स्तरावर नियुक्त संपर्क अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांच्या समन्वयातून ही मोहीम प्रभावीपणे पार पडणार आहे.

ही स्वच्छता चळवळ यशस्वी करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन पंचायत समितीचे सभापती विक्रांत भैय्या डोंगरे, उपसभापती वर्षा जगताप आणि गटविकास अधिकारी नारायण घोलप यांनी केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!