Sat, May 30, 2026
Close

Recent Posts

संपादकीय

“ग्रामसंस्कृतीचा अभिमान : बावधनची बगाड यात्रा”

“ग्रामसंस्कृतीचा अभिमान : बावधनची बगाड यात्रा”
Ashok Ithape
  • PublishedMarch 8, 2026

“तीनशे वर्षांची ग्रामीण परंपरा जपणारी बावधनची श्री काळभैरवनाथ बगाड यात्रा”

महाराष्ट्रातील गावोगावी देव, धर्म आणि परंपरा यांचे अनोखे नाते जपले गेले आहे. या परंपरांमधून केवळ धार्मिक श्रद्धाच नव्हे तर गावकुसातील एकी, सामाजिक बांधिलकी आणि संस्कृतीचे दर्शन घडते. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन गावात दरवर्षी साजरी होणारी ग्रामदैवत श्री काळभैरवनाथाची बगाड यात्रा ही अशाच ऐतिहासिक आणि वैशिष्ट्यपूर्ण परंपरांपैकी एक मानली जाते. सुमारे तीनशे वर्षांची परंपरा लाभलेली ही यात्रा केवळ धार्मिक सोहळा नसून बावधनच्या लोकजीवनातील श्रद्धा, निष्ठा आणि सामूहिक संस्कृतीचे जिवंत प्रतीक आहे.

फाल्गुन वद्य चतुर्थी, पंचमी आणि षष्ठी हे या यात्रेचे मुख्य दिवस मानले जातात. या यात्रेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे “बगाड”. महाराष्ट्रात अशा प्रकारची परंपरा फार थोड्या ठिकाणी पाहायला मिळते. बगाड हा केवळ धार्मिक विधी नसून त्यामागे भक्ती, नवस, धैर्य आणि परंपरेचा संगम दिसून येतो.

ओझर्डे गावाच्या हद्दीत कृष्णा नदीच्या काठावर वसलेले सोनेश्वर मंदिर या परंपरेचे महत्त्वाचे केंद्र आहे. अठराव्या शतकात पिसाळ-देशमुख घराण्याने हे मंदिर उभारले. मंदिरात असलेली भगवान शंकराची पिंड अत्यंत आकर्षक असून पिंडीसमोरील नंदीच्या गळ्यात बगाड्याची प्रतिकृती कोरलेली दिसते. यावरून या परंपरेचे प्राचीनत्व आणि धार्मिक महत्त्व अधोरेखित होते.

बगाड्या होणे ही अत्यंत कठीण आणि पवित्र मानली जाणारी जबाबदारी आहे. बगाड्याला पाच दिवस मंदिरात राहून कडक उपवास पाळावा लागतो. या काळात तो पूर्णतः धार्मिक नियमांचे पालन करीत असतो. ही केवळ एक धार्मिक कृती नसून श्रद्धेची पराकाष्ठा मानली जाते.

बगाडासाठी तयार होणारा रथही तितकाच वैशिष्ट्यपूर्ण असतो. या रथाला दोन मोठी दगडी चाके असतात. सुमारे दहा फूट लांबीचा कणा, त्याला जोडलेला वाघाच्या तोंडासारखा वाघला, त्यावर उभारलेला सुमारे अठरा फूट उंच खांब आणि त्या खांबावर बांधलेले चाळीस फूट उंच कळकाचे शिड—या सर्व घटकांमुळे हा रथ अत्यंत भव्य आणि आकर्षक दिसतो. शिडाच्या पुढील बाजूस असलेल्या झोपाळ्यावर बगाड्याला विशिष्ट पद्धतीने टांगले जाते. विशेष म्हणजे या रचनेमुळे बगाड्याला कोणताही त्रास होत नाही.

कण्याला जोडलेल्या दांड्यांना आणि त्यावरील झुलाला “दुर्वी” असे म्हणतात. या दुर्वीला बैल जोडले जातात आणि त्यांच्याच साहाय्याने हा रथ ओढला जातो. या यात्रेसाठी खास बैलांची तयारी केली जाते. त्यांना रतीब देऊन त्यांची काळजी घेतली जाते. सहा बैलजोड्यांच्या मदतीने हा भव्य रथ ओढला जातो, ही दृश्ये पाहण्यासाठी हजारो भाविक उपस्थित राहतात.

यात्रेची सुरुवात चतुर्थीच्या दिवशी गावातून निघणाऱ्या छबिन्याने होते. देवाच्या पालखीसमोर ढोल, ताशे, लेझीम, सनई, दांडपट्टा अशा पारंपरिक खेळांचे सादरीकरण केले जाते. गावातील तरुणाई यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होताना दिसते. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर आणि “काशिनाथाचं चांगभलं” या घोषणांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय बनते.

पंचमीच्या पहाटे पालखी आणि बगाड्या सोनेश्वर मंदिराजवळ पोहोचतात. तेथे कृष्णा नदीत विधीवत स्नान करून सोनेश्वर आणि कृष्णामाईची पूजा केली जाते. त्यानंतर “काशिनाथाचं चांगभलं” या जयघोषात बगाड्याला बगाडावर टांगले जाते आणि भव्य मिरवणुकीला प्रारंभ होतो. सोनेश्वरपासून सुरू झालेली ही मिरवणूक गावभर फिरत संध्याकाळी भैरवनाथ मंदिरासमोर येऊन पोहोचते. तेथे पुन्हा एकदा जयघोषाच्या गजरात यात्रेची सांगता होते.

या यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गावातील सामाजिक एकोपा. यात्रेच्या निमित्ताने गावाबाहेर नोकरी-व्यवसायासाठी गेलेले चाकरमानीही आवर्जून गावाकडे परततात. आबालवृद्ध, स्त्री-पुरुष, मुले-मुली असे सर्वजण या सोहळ्यात सहभागी होतात. गावातील शिस्त, परंपरेचे पालन आणि सामूहिक सहभाग यामुळे ही यात्रा अधिकच वैशिष्ट्यपूर्ण ठरते.
यंदा रविवार, दि. ८ मार्च रोजी रंगपंचमीच्या दिवशी ही बगाड यात्रा पार पडत आहे. यंदाचा बगाड्या होण्याचा मान विठ्ठल सोपान कदम (वय ४९) यांना मिळाला आहे. आपल्या थोरल्या भावाचे आजारपण दूर व्हावे या भावनेतून त्यांनी २०१० साली भैरवनाथाच्या मंदिरात नवस केला होता. त्या नवसाची पूर्तता करण्यासाठी ते यंदा बगाड्या होत आहेत. ही बाब भक्ती, श्रद्धा आणि देवावरच्या निष्ठेचे जिवंत उदाहरण आहे.

आजच्या आधुनिक युगात अनेक पारंपरिक प्रथा हळूहळू लुप्त होत चालल्या आहेत. मात्र बावधन गावातील बगाड यात्रा ही परंपरा आजही तेवढ्याच श्रद्धेने आणि उत्साहाने जपली जात आहे. या यात्रेतून गावाच्या सांस्कृतिक वारशाचे जतन होत आहे, तसेच पुढील पिढ्यांनाही या परंपरेची ओळख मिळत आहे.

बावधनची ही बगाड यात्रा म्हणजे केवळ धार्मिक विधी नाही, तर गावाच्या अस्मितेचा, एकोप्याचा आणि श्रद्धेचा उत्सव आहे. तीनशे वर्षांची ही परंपरा पुढील अनेक पिढ्यांपर्यंत अशीच जपली जावी, हीच सर्व भाविकांची मनोमन इच्छा आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!