वाईच्या शिरपेचात मानाचा तुरा; अभिषेक ओझर्डे बनले IAS अधिकारी
![]()
UPSC नागरी सेवा परीक्षेत अखिल भारतीय क्रमांक 336; वाईमधील पहिले IAS अधिकारी होण्याचा बहुमान
वाई, प्रतिनिधी :
वाई तालुक्याचे सुपुत्र, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षेत यश संपादन करत अभिषेक अभय ओझर्डे यांनी अखिल भारतीय क्रमांक 336 मिळवत IAS पदासाठी निवड मिळवली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे वाई तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून संपूर्ण तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अभिषेक ओझर्डे यांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे वाईमधून IAS पदावर निवड होणारे ते पहिले अधिकारी ठरल्याने हा तालुक्यासाठी अभिमानाचा क्षण मानला जात आहे.
अभिषेक ओझर्डे हे वाई पंचायत समितीचे ग्रामविकास अधिकारी अभय ओझर्डे यांचे सुपुत्र आहेत. कुटुंबीयांचे मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर त्यांनी देशातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या UPSC परीक्षेत यश संपादन करत तरुणांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
दरम्यान, या यशाबद्दल मा. ना. श्री. मकरंदआबा पाटील, मंत्री मदत आणि पुनर्वसन विभाग महाराष्ट्र राज्य यांनी अभिषेक ओझर्डे यांचे अभिनंदन केले आहे.
“अभिषेक ओझर्डे यांनी UPSC परीक्षेत मिळवलेले यश हे वाई तालुक्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. ग्रामीण भागातील तरुणांनी मोठी स्वप्ने पाहून कठोर परिश्रम केल्यास कोणतेही ध्येय अशक्य नाही, हे त्यांनी सिद्ध केले आहे. त्यांच्या पुढील प्रशासकीय कारकिर्दीस मनःपूर्वक शुभेच्छा.” – मा. ना. श्री. मकरंदआबा पाटील, मंत्री मदत आणि पुनर्वसन विभाग महाराष्ट्र राज्य
अभिषेक ओझर्डे यांच्या यशामुळे वाई तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.













