शिक्षक हा कधीच निवृत्त होत नसतो तो आजीवन शिक्षकच राहतो, श्री.जयवंत शिंगटे यांच्या सेवापूर्वी कार्यक्रमात दिलीप बाबर यांचे गौरवोद्गार
भुईंज l प्रतिनिधी : शिक्षकांचे कार्य हे समाजाला दिशादर्शक असून उद्याची पिढी घडवण्यासाठी शिक्षक कायम प्रयत्नशील असतात. अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम त्यांनी केलेला असतं. अनेक विद्यार्थी त्यांच्या हाताखाली शिकून देशाचे उज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी झटत असतात. मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त होत असलेले जयवंत शिंगटे शिक्षक पदावरून निवृत्त होत असले तरी ते आजीवन शिक्षकच राहणार असल्याचे गौरवोद्गार भुईंज जिल्हा परिषद गटाचे नवनिर्वाचित सदस्य दिलीप बाबर यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किसनवीर नगर शाळेचे मुख्याध्यापक जयवंत शिंगटे यांचा सेवापूर्ती कार्यक्रम उडतरे ता. वाई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित केला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमास वाई पंचायत समिती सदस्या सौ. राणी कांतीलाल पवार, विस्तार अधिकारी दिलीप बाबर, विस्तार अधिकारी शकील मोमीन, केंद्रप्रमुख गजानन वारागडे, केंद्रप्रमुख ज्ञानदेव वेंदे, केंद्रप्रमुख संभाजी भोसले, केंद्रप्रमुख निर्मला भांगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सेवापुर्ती मुख्याध्यापक जयवंत शिंगटे यांची कन्या दिप्ती हिने वडिलांविषयी मनोगतातून भावना व्यक्त करताना वडील व आई यांच्या विषयी अंतर्मुख करणारे समाजाभिमुख विचार प्रकट केले. तेव्हा सारे सभागृह स्तब्ध झाले. सर्वांच्या डोळ्यात पाणी उतरले.
सरांच्या धर्मपत्नी सौ. संगीता शिंगटे यांनी सरांच्या सोबतच्या जीवन प्रवासाचे अनुभव मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविका मध्ये शिक्षक महेंद्र इथापे यांनी जयवंत शिंगटे यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याचा सखोल आढावा मांडत उपस्थितांना खळखळून हसवले. यावेळी अनेक शिक्षकांनी सरांच्या जीवनशैलीचा आढावा घेतला. जयवंत शिंगटे यांनी सुद्धा सत्काराला उत्तर देताना मनोगतातून आपल्या भावना व्यक्त करून उपस्थितांची मने जिंकली. या कुटुंबवत्सल व तेवढ्याच भावना प्रधान कार्यक्रम मोठ्या दिमाखात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमास वाई तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष विजय जाधव, वाई तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष सचिन पांढरपोटे, वीरधवल भिलारे पाटील, शिक्षक बँकेचे व्हाईस चेअरमन नितीन फरांदे, माजी संचालक शिवाजी शिंदे, संतोष शिंदे, शरद यादव, राजेंद्र जाधव, संजय वाघमारे यांसह अनेक शिक्षक उपस्थित होते. तसेच केंद्रातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव कोदे यांनी केले. प्रास्ताविक महेंद्र इथापे यांनी केले. तर आभार केंद्रप्रमुख गजानन वारागडे व ज्ञानदेव वेंदे यांनी मानले.













