वाई महोत्सवात हॉट एअर बलून राईड ठरतेय केंद्रबिंदू; आकाशातून वाईचे विहंगम दर्शन घेण्याची सुवर्णसंधी
वाई, दि. २६ : वाई येथे मोठ्या उत्साहात सुरू असलेल्या वाई महोत्सवाला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असून, महोत्सवातील हॉट एअर बलून राईड हे खास आकर्षण ठरत आहे. माफक दरात उपलब्ध असलेल्या या राईडचा लाभ वाईकरांसह पर्यटक मोठ्या संख्येने घेत आहेत.
नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या वाई महोत्सवात पसरणी येथील जीपी अॅडव्हेंचर अॅण्ड स्पोर्ट या कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्यात प्रथमच हॉट एअर बलून राईडची संकल्पना राबविण्यात आली आहे. या उपक्रमाचे नेतृत्व कंपनीचे मालक गोविंद येवले यांनी केले आहे. महागणपती घाटासमोरील नाना-नानी पार्क येथे सध्या ही राईड उपलब्ध असून, अत्यंत सुरक्षित वातावरणात व सर्व नियमांचे काटेकोर पालन करत ही सुविधा दिली जात आहे.
![]()
विशेष म्हणजे, “ना नफा ना तोटा” या तत्त्वावर ही राईड वाईकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आली असून, साहसी पर्यटनाचा नवा अनुभव नागरिकांना मिळत आहे. नगराध्यक्ष अनिल सावंत व सौ. सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून हॉट एअर बलून राईडचे उद्घाटन करण्यात आले.
या हॉट एअर बलूनमधून सुमारे ४०० फूट उंचीवरून वाई शहराचे विहंगम दृश्य पाहण्याची संधी मिळत आहे. कृष्णा-पंचगंगेच्या काठावर वसलेले वाई, मंदिरांची रचना, घाट, ऐतिहासिक वास्तू आणि निसर्गसौंदर्य यांचे अद्भुत दर्शन आकाशातून अनुभवताना पर्यटकांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे. “पक्षांच्या नजरेतून वाई पाहण्याचा” हा अनोखा आणि रोमांचक अनुभव असल्याची भावना अनेक पर्यटक व्यक्त करत आहेत.
या उपक्रमात शालेय विद्यार्थी तसेच एनसीसी कॅडेट्स यांना विशेष सवलत देण्यात येणार असल्याची माहिती गोविंद येवले यांनी दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांना साहसी खेळांची ओळख होण्यासह सुरक्षित पर्यटनाचा अनुभव मिळणार आहे.
एकूणच, वाई महोत्सवातील हॉट एअर बलून राईडमुळे महोत्सवाला वेगळेच परिमाण प्राप्त झाले असून, वाईचे पर्यटनमूल्य वाढवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरत आहे. नागरिक, पर्यटक आणि तरुणाई यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता येत्या काळात वाई हे साहसी पर्यटनाचे नवे केंद्र म्हणून ओळख निर्माण करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.













