Mon, Mar 2, 2026
साहित्य

AI देखील भारतीय संगीतकारांशी तुलना करू शकत नाही ; श्रीमती श्रेया राजवाडे

AI देखील भारतीय संगीतकारांशी तुलना करू शकत नाही ; श्रीमती श्रेया राजवाडे
Ashok Ithape
  • PublishedMay 10, 2025

सध्याच्या ऑपरेशन सिंदूरला साजेसे ‘जयोस्तुते श्री महन्मंगले’ हे गीत गाऊन कार्यक्रमाची सांगता.

वाई, ता. ९: भारतीय संगीतकारांच्या संगीतातील गोडव्याची सर ए आय ला देखील नाही असे प्रसिद्ध लेखिका व संगीततज्ञ श्रीमती श्रेया राजवाडे ‘गीत उमगले नवे गाणी आणि गप्पा’ या वाई वसंत व्याख्यानमालेच्या नवव्या पुष्पातील व्याख्यानात म्हणाल्या. यावेळी त्यांना संगीत साथ करण्यासाठी त्यांचे सहकारी श्री सचिन केळकर, सौ. शिल्पा केळकर, श्री शैलेश कुलकर्णी व्यासपीठावर होते.

राजवाडे म्हणाल्या, मला गाण्यातील कविता आवडू लागली. संगीतातील वाक्य ,वाद्य ,आलाप व सुरवटींची मोहिनी मनावर पडली. गाणी ऐकताना नकळत मनात कथेशी त्यांचा संबंध जोडला जातो. गाणी ऐकताना शांता शेळके, बा. भ. बोरकर आठवतात. गाण्यांतून मिळणारा आनंद इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘गीत उमगले नवे’ हे पुस्तक लिहिले. १९६० ते २०१५ या विस्तृत कालखंडातील मला भावलेल्या गाण्यांचे संचयन यात आहे.
न समझे वो अनाडी है या गाण्यात नूतनच्या डोळ्यात असलेला मिश्किल भाव राज कपूरचा भाबडेपणा, मध्ये बासरी, सेट चा अनोखा वापर, द्रुकश्राव्यची परिपूर्ण रचना आणि एकॉर्डियनची धून यामुळे गाणे अद्भुत होते.

दिल चाहता है या चित्रपटातील ये कैसी है ऋतू या गाण्यात अक्षय खन्ना, डिंपल कपाडिया यांच्या माध्यमातून तरुण पिढीच्या पद्धतीने संगीत दाखवले आहे. कृष्णधवल चित्रपटांच्या वेळी हिंदी चित्रपटांत संगीतरत्ने होती. १९६१ च्या सुनील दत्त व आशा पारेख यांच्या छाया चित्रपटातील सलील चौधरी यांनी संगीत दिलेले व मोझार्ट च्या सिम्पनी वरून प्रभावित झालेले इतना ना मुझसे तू प्यार बडा या गाण्यावर पिकोलो बासरीचा मोठा प्रभाव आहे.

१९७४ च्या रजनीगंधामधील कई बार युही देखा है या गाण्यात मुकेश चा आवाज ,कवी योगेश यांचे शब्द व विद्या सिन्हा यांचा अभिनय गाण्याला वेगळ्या उंचीवर पोहोचवतो. अनुभव चित्रपटातील मेरी जा या गुलजार लिखित व गीता दत्तने गायलेल्या गाण्यासाठी अत्यंत तुटपुंज बजेट होते. मात्र कनू रॉय या प्रतिभावंत संगीतकाराने व्हायब्र्रा फोन या एका वाद्यावर गाण्याची उंची वाढवली.

गुलजार लिखित ,आर.डी. बर्मन चे संगीत असलेले व किशोर कुमार नी गायलेले आनेवाला पल जानेवाला है या गाण्यात क्षण गमावण्याची भीती दिसते मात्र दुसरीकडे किशोरदांचा आवाज अनोळखी गोष्ट सांगत असल्यासारखा वाटतो. यात व्हायलीन व ट्रंपेट चा उत्कृष्ट प्रयोग आहे.

मराठी भावगीते आपल्या हृदयाच्या जवळ असतात. वसंत पवार, सुधीर फडके यांनी आपले भावविश्व समृद्ध केले. कृष्णधवल चित्रपटांपासून ते आज पर्यंत हळुवारपणा जपणारी मराठी प्रेम गीते चालत आली आहेत. काळ बदलतो पण प्रेम नाही याचे हे प्रतीक आहे. मुंबई पुणे मुंबई मधील कधी तू हे अविनाश विश्वजीत यांच्या प्रसन्न संगीत रचनेचे असेच एक मराठी गाणे आहे. छोटी सी बात मधील जानेमन हे आशा भोसले व येसुदास यांनी गायलेले गाणे देखील मनाला भुरळ पाडणारे आहे.

राजवाडे यांनी संगीत विश्वाची इत्यंभूत माहिती दिली. या आठ गाण्यांवर श्रेया राजवाडे यांच्या सहकाऱ्यांनी संगीत साथ दिली. सध्याच्या ऑपरेशन सिंदूरला साजेसे ‘जयोस्तुते श्री महन्मंगले ‘ हे गीत गाऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

प्रास्ताविक व परिचय सौ कविता किशोर अभ्यंकर यांनी तर पाहुण्यांचा सत्कार अजित क्षिरसागर, श्रीनिवास खरे, सौ स्मिता माधव कान्हेरे,सौ तनुजा समित इनामदार यांनी केला.
डॉ विक्रम तांबे व सौ पुष्पा शिवाजी कदम (कदम लॅब)यांनी कार्यक्रमाचे प्रायोजन केले होते. रसिक श्रोत्यांनी कार्यक्रमाला उत्तुंग प्रतिसाद दिला.

फोटो खालील ओळी – समारोप प्रसंगी सौ श्रेया राजवाडे,सचिन केळकर,सौ शिल्पा केळकर,शैलेश कुलकर्णी यांनी सावरकर गीत गायिले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!