साताऱ्याची सुवर्णकन्या सुदेष्णा शिवणकर देशातील सर्वात वेगवान धावपटू
![]()
रांचीतील राष्ट्रीय स्पर्धेत १०० मीटरमध्ये सुवर्णपदक; आता आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जपानमध्ये करणार भारताचे प्रतिनिधित्व
सातारा : सातारा जिल्ह्यासाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण ठरलेल्या कामगिरीत जावली तालुक्यातील खर्शी गावच्या कन्या सुदेष्णा शिवणकर हिने देशातील सर्वात वेगवान धावपटू म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. रांची येथे पार पडलेल्या २९ व्या सीनियर राष्ट्रीय फेडरेशन चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत तिने १०० मीटर धावण्याची शर्यत अवघ्या ११.५६ सेकंदात पूर्ण करत सुवर्णपदक पटकावले.
या शानदार विजयामुळे सुदेष्णाने आगामी आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ साठी भारतीय संघात स्थान निश्चित केले असून, आता जपानमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना साताऱ्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकणार आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जावली तालुक्यातील खर्शी या छोट्याशा गावातून आलेल्या सुदेष्णाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले. गावातील मातीच्या ट्रॅकवर सराव करत तिने राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली. प्रशिक्षक बळवंत बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यपूर्ण सराव आणि आत्मविश्वासाच्या बळावर तिने हा सुवर्ण प्रवास घडवून आणला.
सुदेष्णाच्या या यशामुळे साताऱ्याच्या क्रीडा क्षेत्राला नवी प्रेरणा मिळाली असून, ग्रामीण भागातील खेळाडूंनाही मोठी उभारी मिळणार आहे. तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, विविध स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
“साताऱ्याची माती पुन्हा एकदा देशात चमकली आहे,” अशी भावना व्यक्त करत सातारकरांनी सुदेष्णाच्या यशाचा जल्लोष केला. आता जपानमध्येही साताऱ्याचा झेंडा अभिमानाने फडकवावा, अशा शुभेच्छा नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.





















