Sat, Jun 13, 2026
Close

Recent Posts

सातारा जिल्हा

सातारा विभूषण हरपले

सातारा विभूषण हरपले
Ashok Ithape
  • PublishedOctober 16, 2025

सातारा येथील करसल्लागार , साहित्यिक , चित्रपट निर्माते, शिक्षणाची खऱ्या अर्थाने चाड असणारे, क्रीडा , संगीत ,नाट्य , कला याचे रसिकाग्रणी अरुणराव गोडबोले यांचे निधन झाले. सातारा शहराचेच का सातारा जिल्ह्याचे खऱ्याअर्थाने भूषण हरपले. एक चालत बोलता माहितीकोश काळाच्या पद्याआड गेला. खरे तर डिसेंबर ,जानेवारी पासून त्यांच्या प्रकृतीत चढ उतार होत होते. त्यांना दवाखान्यात भरती करणे आणि बंधू डॉ.अच्युतराव आणि पुतण्या डॉ. चैतन्य कन्या ,जावई यांच्या उपचारांनी चिरंजीव उदयन यांच्या धावपळीने पुन्हा मूळपदावर येणे सुरु होते.

दरवर्षी दिवाळी साठी ते शुभेच्छा पत्रे तयार करतात . एक सुंदर कविता त्यावर असते. कविता लिहून झाली रे झाली की त्यांचा फोन यायचा . कविता वाचन व्हायचे. कविता , अध्यात्मिक ग्रंथ , प्रवास वर्णन , संशोधनात्मक लिखाण, देशाचा अर्थसंकल्पावर अर्थसंकल्प जाहीर होताच त्याच दिवशी विश्लेषणात्मक लेखन , निवडणुकीत गांभीर्यपूर्वक केलेले चिंतन ते टोप्या उडवणाऱ्या चारोळ्या , नितांत सुंदर , हळवी व्यक्तिचित्रणे खरेतर त्यांच्या लिखाणाला कोणत्याच मर्यादा नव्हत्या. ते जिथे जायचे त्या रंगात सहज मिसळून जायचे. अत्यंत अकृत्रिम स्नेह निर्माण करायचे. अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाला ते आपले वाटायचे .

समाज कारणात बहुतेक मतभेद , वाद, हेवेदावे , स्पर्धा , चढाओढ कायम पहायला मिळते. सातारा शहर फार मोठे नाही. मानवी कौशल्य आणि निष्ठा असणारी मंडळी त्यामुळे कमी आहेत. आपण बरे आपले काम बरे अशी मानसिकताच जास्त . त्यामुळे समाजकारणात माणसे मिळवणे ,त्याची मोट बांधणे , ठरवलेल्या लक्षापर्यंत त्यांना नेणे अवघड काम . अरुणराव गोडबोले हे कार्य सहज करायचे . अनेक लहान मोठ्या संस्थांवर ते पदाधिकारी होते. संस्था लहान असो व मोठी जीव लावून काम करणे हे त्यांचे तत्व .यावेळी त्यांनी अनुभवी ज्येष्ठ आणि तरुण उत्साही मंडळींना एकत्र केले. वयाच्या ६५ वर्षां नंतर त्यांनी अनेक संस्थातून निवृत्ती घेतली. नव्या दमाच्या , कल्पक मंडळींच्या हातात संस्था दिली. ते म्हणायचे आता केवळ मार्गदर्शन करेन ते ही विचारले तर .इदं न मम ही आंतरिक भावना सगळे काही सोडताना असणे सोपे नाही. युनायटेड वेस्टर्न बँकेचे संचालक ,अर्कशाळा , समर्थ सेवा मंडळ , अंत्यसंस्कार मंडळाचे कर्तेधर्ते ते अगदी सोमण सभागृहाचे संचालक , अध्यक्ष अशी मोठ्या आवाक्यात ,लोकल ते ग्लोबल ;त्यांची सातारा शहराशी नाळ जुळलेली होती .

राजघराण्याशी पिढ्यानपिढ्याचे जिव्हाळ्याचे सम्बन्ध होते. स्व. भाऊसाहेब महाराज त्याचे स्नेही होते.सातारा येते १९९१ मध्ये झालेले साहित्य सम्मेलनाचे ते कार्यवाह होते. तर स्व. भाऊसाहेब महाराज स्वागताध्यक्ष . ! नितांत सुंदर देखणे संमेलन स्व. शंकर सारडा, संभाजीराव पाटणे, प्रकाश गवळी आदी नव्या जुन्या मंडळींना घेऊन त्यांनी पार पडले. आजही लक्षात असलेले परिसंवाद, लेखक तुमच्या घरी सारखी योजना यामुळे संमेलन यादगार झाले. आता त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ ९९ व्या सातारा येथील साहित्य संमेलनातील ग्रंथ दालन वा महत्वाच्या दालनाला अरुणराव यांचे नाव देऊन संयोजकांनी सातारकरांच्या वतिने त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करावी.

पं. भीमसेन जोशी, पं . प्रभाकर कारेकर , पं . हरिप्रसाद चौरसिया ,तबलावादक घाटे, पखवाज वादक पं . भवानी शंकर, नव्या पिढीतले संजीव अभ्यंकर, मंजुषा पाटील अशी अनेक नावे व त्याचे गायन – वादन सातारकरांना अरुणराव गोडबोले यांच्यामुळे अनुभवता आले. प्रभाकर पणशीकर, काशिनाथ घाणेकर ही नाट्य क्षेत्रातील मान्यवर दिग्गज तर मोहन जोशी, लक्ष्मीकांत बेर्डे,नितिश भारद्वाज,१००फेम शिर्के,सातारचे प्रताप गंगावणे या सह सुबल सरकार, अण्णासाहेब देऊळगावकर, वैद्य अशी चित्रपट क्षेत्रातील अशी अनेक मान्यवर मंडळी किती आदर ,स्नेह,जिव्हाळ्याने वागायची हे पाहिले आहे.चित्रपटातली अनेक मंडळी ते दिसले की पाया पडताना पाहायला मिळायची. हे भाग्य फारच कमीजणांच्या वाट्याला येते.त्यांच्या मुळे या महान व्यक्तीमत्वांचा सहवास लाभला.
त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या ,गोडबोले कुटुंबाच्या मिळकतीतून केली आजपर्यंत लाखो रुपयांची मदत अनेक विद्यार्थी आज कृतज्ञ भावनेनी सांगतात.

समर्थ सृष्टी सारखा नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी घेतलेले कष्ट,चाफळच्या राम मंदिराचा विकास, समर्थ साहित्य, कर्तृत्व देशातच नव्हे परदेशात पोचवायची धडपड , समर्थ साहित्य सीडी कॅसेटवर ,प्रतयक्ष कार्यक्रम करून प्रचार प्रसाराचा ध्यास ,नव्या तंत्रज्ञानाचा वापर करताना तो अवगत करण्याची इच्छा पुढे जाऊन कृती जवळून पाहिली आहे.

साताऱ्यात जन्मून साताऱ्या बाहेर जाऊन साताऱ्याचे नाव मोठे करणारे खूप आहेत. बाहेरची मंडळी साताऱ्यात आली त्यांनी साताऱ्याचे नाव मोठे केले अशी काही मंडळी आहे. पण साताऱ्यात जन्मले , वाढले आणि बाहेर संधी असताना शेवट पर्यंत साताऱ्यात राहून साताऱ्याचे नाव मोठे करणे अरुणराव गोडबोले यांच्या सारखी व्यक्तिमत्वे विरळीच म्हणून ते आदरणीय आहेत. त्यांच्या निधना नंतर डॉ. अच्युत गोडबोले यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना , अरुणराव संपन्न जीवन जगले असे उद्गार काढेल . त्यांचे म्हणणे बरोबर आहे. पण अरुणरावांचे वेगळेपण त्यांच्या संपन्न जीवन जगण्यात नसून दुसऱ्यांचे जीवन संपन्न करण्यात होते. सामाजिक कामात त्यांनी असे अनेकांचे जीवन संपन्न तर केलेच मात्र ते करताना अत्यंत निर्लेप , निर्मोही , विकल्पशून्य , उदार मनाने केले . दुसऱ्याला नामानिराळे राहून मदत केलेल्या अनेकांची नावे सांगता येतील. ही नावे अरुणराव गोडबोले यांनी सांगितली नाहीत तर त्याच व्यक्तींनी विविध कार्यक्रमात , लेखात ऋणनिर्देश म्हणून सांगितली . कुठे लेख लिहिले तेंव्हा अरुरावांच्या मौन दातृत्वाची महती समजली. त्यांचे कर्तृत्व अफाट आहे .सत्शील आहे. समर्थ साहित्य त्यांनी केवळ वाचले नाही तर ते जगले . साताऱ्यातली त्यांची ती जागा कोणी किती ही प्रयत्न केले तरी ही घेणे आशक्य आहे. त्यांची माणुसकीवर प्रेम करण्याची अनावर इच्छा आणि दानत सांभाळणे सोपे नाही .

अनेकांना सातारा भूषरस्काराने सन्मानित करणारे अरुणराव खऱ्या अर्थाने सातारा पद्मविभूषण होते. त्यांच्या कुटुंबाला या शोक सागरातून बाहेर पडणे अवघड आहे. मात्र हे दुःख पेलण्याची ताकद त्यांना परमेश्वराने ,श्रीरामाने द्यावी ही प्रार्थना .

– मधुसूदन मच्छिंद्र पतकी

१५.१०.२०२५ (बाकी माझ्या, वैयक्तिक सुमारे ३०,३५ वर्षे त्यांच्या सहवासातल्या शेकडो आठवणी सोबत आहेत.)

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!