पुनर्वसित काळोशीतील रस्त्यासाठी रयत स्वाभिमानी संघटना आक्रमक
![]()
त्रयस्थ व्यक्तींच्या विरोधातून रस्त्याचे काम रखडवल्याने स्थानिकांची मोठी गैरसोय; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर
सातारा / प्रतिनिधी : सातारा तालुक्यातील पुनर्वसित काळोशी गावातील रस्त्याच्या प्रश्नावरून रयत स्वाभिमानी संघटना आक्रमक झाली आहे ग्रामस्थांचा रस्त्याचा प्रश्न सोडवत नसल्यास तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा प्रदेशाध्यक्ष सागरदादा पवार यांनी प्रशासनास दिला आहे. जिल्हाध्यक्ष सुशीलभाऊ कदम, अभय जाधव, संदीप जाधव,सुमित साळुंखे भाऊ आदी पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काळोशी पुनवसिंत या गावाने जिल्हा प्रशासनाकडे दि. २५/०७/२०२३ रोजी गावासाठी मंजूर झालेल्या रोडच्या अडचणी बाबत पत्रव्यवहार केला होता. त्यात ग्रामस्थ काळोशी, पोलिस अधिक्षक सातारा, पुनवर्सन शाखा, जिल्हाअधिकारी कार्यालय, नायब तहसिलदार (फौजदारी शाखा) जिल्हाधिकारी कार्यालय सातारा, यांस पत्रव्यवहार करून विषयांकित गावासाठी एस.एच. १४० कोडोली ते पांढरवाडी रस्ता कि.मी. २.५३० या रस्त्याच्या कामात प्रशासकीय मंजूरी दि. ०७/०६/२०१९ रोजी प्राप्त झाली होती. सदर कामास तांत्रिक मंजुरी दि. ०६/१०/२०२० रोजी प्राप्त झाल्यानंतर मक्तेदारास दि. ०९/०४/२०२१ रोजी कार्य प्रारंभ आदेश देण्यात आला होता. सदर रस्त्यांवरील स्थानिक विरोधकांमुळे काम होऊ शकत नाही, असा पत्रव्यवहार प्रशासनाने केला आहे.
सदर विषयाबाबतीत होणारा विरोध हा केवळ फार्स असून त्यातील बरेच विरोध करणारे त्या परिसरातील वहिवाटदार नसून अनागोंदी कारभार करूनज्यांचा या विषयाशी अर्थाअर्थी संबंध देखील नाही, अशा लोकांच्या देखील सह्या यावर घेतल्या आहेत. सदर काम ऐशियन डेव्हलपमेंट बँक (एडीबी) अर्थ सहाय्यित असलेने सदर कामावर एडीबी चे पीआयएससी अधिकारी यांनी वेळोवेळी कामावर भेट देवून ग्रामस्थांनी वारंवार सुचविण्यात आले होते.
तथापि काही हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या ग्रामस्थांच्या विरोधामुळे एडीबी च्या पीआयएससी च्या अधिकाऱ्यांनी काम रद्द करावे जेणेकरुन ग्रामस्थांच्या वैचारिक भेदामुळे निर्माण होणारी वादग्रस्त परिस्थिती थोपवण्यात येईल. असे दि. ०६/१२/२०२२ च्या पत्राने कळविले आहे. परंतु ही परिस्थिती हेतू पुरस्पर काम होवू न देण्याच्या हेतूने दाखविली जात आहे. यात कोणतेही तथ्य नाही.
एकंदरीत प्रशासनाचे उंबरे झिजवून त्रस्त ग्रामस्थांनी रयत स्वाभिमानी संघटनेच्या संपर्क कार्यालयात येवून संबंधित विषयात प्रदेशाध्यक्ष सागरदादा पवार यांना भेटून याबाबत लक्ष देवून आम्हांस न्याय मिळवून दयावा, असे निवेदन त्रस्त ग्रामस्थांच्यावतीने देण्यात आले होते. पुनवर्सित काळोशी या गावच्या ग्रामस्थांनी ही तेथील तिसरी पिढी असून ही त्यांना त्यांच्या मूलभुत हक्कांपासून वंचित रहावे लागत आहे, ही बाब अत्यंत क्लेशदायक असून याबाबतीत सत्यता पडताळून दहा दिवसाचे आत संबंधित काळोशी ग्रामस्थांच्या रस्त्याचा प्रलंबित प्रश्न प्रशासन स्तरावर सोडवावा, अन्यथा पुनवर्सित काळोशी ग्रामस्थांच्या लोकांच्या न्याय हक्कासाठी तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.
या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या सामाजिक असंतोषास प्रशासन जबाबदार असेल असा इशाराही लेखी स्वरूपात रयत स्वाभिमानी संघटनेने दिला आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक सातारा, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय पुनर्वसन शाखा व प्रसारमाध्यमांच्या सर्व प्रतिनिधींना दिल्या आहेत.













