‘किसन वीर’चे वैभव सभासदांमुळे व वाढणारही तुमच्यामुळेच – आमदार मकरंदआबा पाटील
![]()
वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार

भुईंज : दि. ३० : किसन वीर कारखाना आता खऱ्या अर्थाने वाट पाहत होता, तो क्षण जवळ आलेला असून आता कारखाना फक्त कात टाकत असून भविष्यात तुमच्या व आमच्या स्वप्नातील कारखान्याचे चित्र लवकरच साकार होणार आहे. किसन वीर कारखान्याचे वैभव हे सभासदांमुळेच टिकुन आहे व ते वाढविण्याचे कामही तुम्ही सभासदच करणार असल्याचे गौरवोदगार किसन वीर कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील यांनी काढले.
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखानाच्या सन २०२३-२४ या वर्षाच्या अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा बँकेचे चेअरमन खासदार नितीनकाका पाटील, कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, ज्येष्ठ संचालक बाबासाहेब कदम, वाई तालुका सहकारी सुतगिरणीचे चेअरमन शशिकांत पिसाळ, खंडाळ्याचे व्हाईस चेअरमन राजेंद्र तांबे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार पाटील पुढे म्हणाले की, कारखाना ताब्यात घेतल्यापासुन मागील दोन हंगामाची ऊस बीलाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलेली आहे. परंतु मागील सन २०२०-२१ मधील थकीत देव्य बीले मागणीकरीताही शेतकरी आमच्याकडे यायचे कारण त्यांना माहित होतं किंवा त्यांचा विश्वास होता की, आमचे व्यवस्थापन ही बीले देऊ शकते. एनसीडीसीमार्फत जे ४६७ कोटी रूपयांचे कर्ज मिळालेले आहे त्याकरिता प्रतिवर्षी ५० कोटी रूपये बँकेकडे भरावे लागणार आहे. त्यामुळे सभासदांनीही आतापर्यंत जो विश्वास दाखविलेला आहे तसाच विश्वास यापुढेही दाखवुन आपला संपुर्ण ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्याला गळिताकरिता द्यावा. सध्याच्या काळात आम्ही कारखाना मोठ्या काटकसरीने चालवित आहोता. मागील अडीच वर्षाच्या कालावधीत एकाही मिटींगचा भत्ता घेतलेला नाही. तसेच आम्ही आमच्या गाड्या आमच्या स्वतःच्या खर्चाने चालवितो. किसन वीर व खंडाळा या दोन्ही कारखान्याचे गळीत पुर्ण क्षमतेने चालविल्यास किसन वीरचे पुर्वीचे वैभव पुन्हा आणणार याची सर्वांनी खात्री बाळगण्याची खात्रीही यावेळी आमदार मकरंदआबा पाटील यांनी दिली.
खासदार नितीनकाका पाटील म्हणाले की, कारखाना मे २०२२ मध्ये ताब्यात घेतला. ९५० कोटी रूपयांचे कर्ज होते ते माहिती होतं परंतु काही प्रश्न अनुत्तरीत होते. यामध्ये कारखान्यात साखर, मोलॅसिस काय काय शिल्लक आहे याची माहिती नव्हती. मागील संचालक मंडळाने केलेल्या भ्रष्ट व दिवाळखोरीमुळे बँकांची मागील ३ वर्षापासूनची व्याज थकलेली होती. बँका एनपीएत गेलेल्या होत्या. त्यामुळे आता ही संस्था वाचवायची कशी हा मोठा प्रश्न आमच्यासमोर होता. त्यावेळी कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेअर्स भाग भांडवल वाढविण्याचे आवाहन सभासदांना करण्यात आले. याला प्रतिसाद देत २ महिन्यातच सभासदांनी ३० कोटी रूपयांचे भाग भांडवल जमा केले. तसेच कारखान्यातील विक्री योग्य नसलेली साखर, स्क्रॅप व अल्कोहाल विक्रीतुन मिळालेल्या रक्कमेवर कारखाना कोणतीही बँक अथवा पतसंस्थेचे वित्तसहाय्य न घेता सुरू केला. शेतकरी, तोडणी वाहतुकदार व पुरवठादारांनी सर्व देणी वेळेवर देण्यात आम्ही यशस्वी ठरलो. मागील हंगामात ऊस बीले देण्यात आम्हाला थोडा विलंब झाला. बाजारभावातील साखरेच्या चढ-उतारामुळे ही बीले मिळण्यास दिरंगाई झालेली होती. परंतु आमदार मकरंदआबांनी दिलेल्या शब्दानुसार शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दानुसार प्रतिटन तीन हजार रूपयांप्रमाणे ऊस बीले शेतकऱ्यांच्या खात्वावर वर्ग करण्यास आबांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ यशस्वी ठरले. किसन वीरची उभारणी स्व. आबांनी केली. मध्यंतरीच्या कालखंडातील लोकांनी याला बुडविण्याचे पाप केले परंतु आपल्या कारखान्याचे जननायक आमदार मकरंदआबा पाटील यांनी हा कारखाना पुन्हा वाचविला, एका आबांनी या संस्थेची निर्मिती केली व एका आबांनी तो वाचविण्याचे काम केले. कारखान्याच्या इतिहासात याची नोंद होईल. शासनाने जे ४६७ कोटी रूपये दिलेले आहेत. त्याबाबत बँकांशी सेंटलमेंट सुरू आहे, त्याचा निर्णय लवकरच लागेल. मागील व्यवस्थापनाने जीएसटीची रक्कम भरलेली नव्हती, कामगारांच्या पीएफची रक्कम भरणे, या सर्व रक्कमा फायनल झाल्यानंतर यासर्व रक्कम कुणाला व किती दिली याबाबत सर्वांना सांगितले जाईल, असे आश्वासनही यावेळी खासदार नितीनकाका पाटील यांनी दिले.
कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी अहवाल वाचन केले. यावेळी विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. यावेळी त्यांनी मागील दोन वर्षापुर्वी कारखाना ताब्यात घेतल्यांनतर जी मानसिकता होती. यामध्ये आता बदल झालेला दिसून येत आहे. सभासद, तोडणी वाहतुक कंत्राटदार, पुरवठादारांचा कारखान्याच्याविषयी जी विश्वासार्हता होती ती वाढलेली दिसत आहे. सभासदांनी कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळावर जो विश्वास टाकलेला आहे, तो सार्थ ठरविण्याचा प्रयत्न यशस्वी होत असल्याचा आम्हाला अभिमान असल्याचेही यावेळी श्री. शिंदे यांनी सांगितले. आभार संचालक दिलीप पिसाळ यांनी मानले.
यावेळी कारखान्याचे संचालक दिलीप पिसाळ, सचिन साळुंखे, रामदास गाढवे, हिंदुराव तरडे, किरण काळोखे, रामदास इथापे, प्रकाश धुरगुडे, संदीप चव्हाण, सचिन जाधव, ललित मुळीक, संजय फाळके, शिवाजीराव जमदाडे, संजय कांबळे, हणमंत चवरे, सुशिला जाधव, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, बबनराव साबळे, अरविंद कदम, अॅड. उदयसिंह पिसाळ, मानसिंग साबळे, माधवराव डेरे, शिवाजीराव काळे, नानासाहेब कदम, यशवंत जमदाडे, शशिकांत भोईटे, सुर्यकांत बर्गे, बी. आर. सावंत, शिवाजीराव महाडीक, बाळासाहेब वीर, राजेंद्र शेलार, मंगेश धुमाळ, भैय्यासाहेब डोंगरे, सत्यजीत वीर, मनीष भंडारे, चंद्रकांत ढमाळ, किसन ननावरे, चरण गायकवाड, माजी संचालक अमृतराव शिंदे, शिवाजीराव गायकवाड, दिपक बाबर, कुमार बाबर, निवास शिंदे, राजेंद्र सोनावणे, कांतीलाल पवार, शुभम पवार, नारायण नलवडे, सुजित जाधवराव, विविध संस्थांचे पदाधिकारी, ऊस उत्पादक सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.
१) सन २०२०-२१ ची बीले देऊन शेतकऱ्यांची दिवाळी करणार गोड आमदार मकरंदआबा पाटील
किसन वीर कारखान्याची सत्ता ताब्यात घेतली त्यावेळी २०२०-२१ चे ६२ कोटी बील देय्य होते. मागील दोन वर्षात यामधील जवळपास १२ कोटी व इतर बँकांचे १० कोटीची देणी आमच्या व्यवस्थापनाने दिलेली होती तीही कोणत्याची वित्तसंस्थेचे सहाय्य न घेता. सन २०२०-२१ मधील शेतकऱ्यांची उर्वरित बीले १५ ऑक्टोंबरपुर्वी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार असल्याचे सांगितले. तसेच जे सभासद कारखान्याला ऊस पुरवठा करतील त्यांना पुढील वर्षापासून १० किलो साखर वाटप सुरू करणार असल्याचे आश्वासनही दिले. शेतकऱ्यांनी आपला संपुर्ण ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्यास देऊन सहकार्य केल्यास किसन वीर दरामध्येही कमी पडणार नसुन दोन ते तीन वर्षामध्ये पुर्वीप्रमाणे साखरेचे धोरणही सुरू करणार असल्याचे सांगितले.
२)ज्यांनी जी पापं केली आहेत त्यांची पापं त्यांच्याच पदरात टाकणार खासदार नितीनकाका पाटील
काही सभासदांनी मागील दोन वार्षिक सभेमध्ये प्रश्न उपस्थित केलेला होता की भ्रटाचार केलेल्या मंडळींना तुम्ही सोडणार का ? असाच प्रश्न यावर्षीही जावली तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला. त्यावर खासदार नितीनकाका पाटील यांनी सांगितले की, सर्व कागदपत्रे तयार असुन एका एकातुन मोकळं झाल्यावर किसन वीर व खंडाळा कारखान्यामध्ये ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. ज्यांनी पापं केलेली आहेत. त्यांची पापं त्यांच्याच पदरात टाकणार असल्याचे सांगितले. तसेच २ ऑक्टोंबर रोजी सातारा जिल्हा बँकेच्या ७५ व्या अमृतमहोत्सवर्षी वर्षाची सांगता होत असुन यादिवशी राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व अजितदादा पवार यांच्या उपस्थित होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहनही जिल्हा बँकेचे चेअरमन खासदार नितीनकाका पाटील यांनी केले.













