पसरणी येथे वीज पडुन ३८ बकर्या मृत्युमुखी
वाई, दि. ४: वाई व परिसरात दुपारी विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाने हजेरी लावली. यावेळी पसरणी येथे वीज पडुन ३८ बकर्या मरण पावल्या. तर आलेल्या पुरात ३० ते ३५ लहान कोकरे वाहून गाळात रुतून मरण पावली. यात जगन्नाथ श्रीपाती कोळेकर ( मूळ रा. नांदल, ता. फलटण, सध्या रा. पसरणी ) या मेंढपाळचे सुमारे दहा लाखाचे नुकसान झाले.
वाई परिसरात आज दुपारी १.३० वा. सुमारास अचानक मुसळधार पावसाने सुरुवात केली. यावेळी विजांच्या गडगडाट व सोसाट्याचा वारा ही सुटला होता. मध्ये सुरुवात केली. सुमारे एक तास मुसळधार पाऊस कोसळत होता. यावेळी जगन्नाथ श्रीपाती कोळेकर ( रा.नांदल, ता. फलटण, सध्या रा. पसरणी ) हे बकऱ्या चरण्यासाठी डोंगरात गेले होते. गावातील नवाब बंगल्याच्या मागील बाजूस ट्याळमुखाच्या पायथ्याला असलेल्या वडाच्या झाडाखाली पावसापासून वाचण्यासाठी बकऱ्या जमा झाल्या होत्या. यावेळी अचानक विज पडून ३८ बकऱ्या जागेवर मरण पावली. तर सुमारे ३०-३५ लहान कोकरे पुरात वाहून जाऊन लागतच्या बंधाऱ्याचा गाळात गडप झालीत.
सदर घटनेची माहिती ग्रामस्थांना करताच त्यांनी तातडीने डोंगराकडे धाव घेतली. घटनेचे गाभीर्य पाहून उपसरपंच बद्रीनाथ महांगडे व युवा नेते स्वप्नील गायकवाड यांनी शासकीय यंत्रणांना फोन करून घटनेची माहिती दिली.
वाईच्या तहसीलदार साेनाली मेटकरी यांनी घटनास्थळाची पाहणी करून मेंडपाळास धीर दिला तर तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना मंडळाधिकारी विश्वनाथ कांबळे यांना दिल्या. यावेळी नायब तहसीलदार भाऊसाहेब जगदाळे, पशुधन विकास अधिकारी डॉ. जितेंद्र पाठक, तलाठी अमोल कुंभार, बाजार समितीचे संचालक तानाजी कचरे आदी उपस्थित होते.
दरम्यान आमदार मकरंद पाटील यांनीही दूरध्वनीवरून सदर घटनेची माहिती घेऊन योग्य पद्धतीने कारवाई करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले.
पंचनामा केल्यानंतर सदर मेंढ्या तरुणांनी बाहेर काढल्या व ट्रॉलीच्या सहाय्याने जेसीबीने खड्डा काढून त्यांचे शवविच्छेदन केल्यानंतर खड्ड्यामध्ये त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली.
सुमारे 40 वर्षापासून कोळेकर आपल्या मेंढ्या चारण्यासाठी पसरणी येथे येत असतात त्यांच्यावर अचानक आलेल्या संकटामूळे त्यांनी अक्षरशा टाहो फोडला. पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलेल्या मेंढ्या डोळ्या देखत मरताना पाहून त्यांना अश्रू अनावर झाले होते.













