![]()
मा. केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप यांच्या हस्ते महेश गोंजारी, साईनाथ वाळेकर, सचिन सावंत, धनंजय बाबर, विनोद कळंबे यांच्यासह ॲड. क्रांती पाटील, माया अंधारे, उमा देसाई, भगवान शेवाळे, आदींना दि प्राइड ऑफ इंडिया भास्कर ॲवॉर्ड प्रदान
पणजी / विशेष प्रतिनिधी –
महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना आजवर गौरविलेले आहे. आगामी काळात पुरस्कार विजेत्यांच्या कामाचे मूल्यमापन करून त्यांना पुनश्च गौरवण्यासाठी कार्यरत राहावे, असे आवाहन करून माजी केंद्रीय कायदामंत्री ॲड. रमाकांत खलप यांनी सातारा जिल्ह्याच्या वाई व महाबळेश्वर तालुक्यातील कर्तुत्ववान रत्नांचा गोव्यामध्ये होत असलेला सन्मान ही बाब राष्ट्रीय एकात्मता वाढवणारी व अनेकांना प्रेरणा देणारी असल्याचे मत व्यक्त केले आहे.
श्री. खलप यांच्या हस्ते वाई तालुक्यातील सहा.अभियंता महेश गोंजारी, साईनाथ वाळेकर, सचिन सावंत, धनंजय बाबर व महाबळेश्वर तालुक्यातील विनोद कळंबे यांना दि प्राइड ऑफ इंडिया, भास्कर भूषण ॲवॉर्ड देऊन गौरवण्यात आले. त्यावेळी श्री. खलप यांनी हे गौरवोद्गार काढले.
जर्नालिस्ट फाउंडेशनच्या 19 व्या अखिल भारतीय स्तरावरील भास्कर भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात ॲड. रमाकांत खलप बोलत होते. अध्यक्षस्थानी गोव्यातील ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री विनायक खेडेकर होते. याप्रसंगी शिर्डीचे माजी नगराध्यक्ष व गोव्यातील प्रसिद्ध शेतकरी पद्मश्री संजय पाटील, संस्थापक अध्यक्ष डॉ. राजू लोहार, उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार दत्ता मर्ढेकर, चंद्रकांत कुंभार, दगडू माने, मोसिन शेख, संकल्प न्यूजचे संपादक अशोक इथापे आदी मान्यवर उपस्थित होते.
गोवा राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष राजतिलक नाईक, लावणीसम्राज्ञी आरती काळे- नगरकर, वैशाली वाफळेकर, अग्निहोत्रच्या नलिनीदीदी पोतदार, डाॅ. विवेक लोळगे(ठाणे), डॉ. जी. एम. सुतार, स्वाती गोखले, आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात काम केलेल्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
वाई सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यक्षम उपविभागीय अभियंता महेश गोंजारी, गट शिक्षणाधिकारी साईनाथ वाळेकर, वाईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सचिन सावंत, किकली गावचे लोकनियुक्त सरपंच व भैरवनाथ पोल्ट्री उद्योग समूहाचे संचालक धनंजय बाबर, पाचगणीतीलस सामाजिक कार्यकर्ते विनोद कळंबे यांचा गौरव करण्यात आला.
अध्यक्ष स्थानावरून ज्येष्ठ साहित्यिक विनायक खेडेकर म्हणाले, ॲवॉर्डच्या धरतीवर भास्कर पुरस्कार तितक्याच तोलामोलाचा आहे. संपूर्ण महाराष्ट्रात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांना निवडून महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन देत असलेले पुरस्कार ही बाब कौतुकास्पदच आहे. ज्यांना या पुरस्काराने सन्मानित केले जात आहे अशा मान्यवरांचे गोव्याच्या भूमीत स्वागत करतो.
विविध क्षेत्रात आपापल्या तेजानं झळकत राहिलेल्या अनेक ज्योतींचा सन्मान झाला पाहिजे. ज्योत प्रज्वलित करण्यासाठी दुसरी ज्योतच लागते, हे आपण लक्षात ठेवूया. पुरस्कारांचे जे मानकरी आहेत त्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची परंपरा मोठ्या श्रद्धेने गेल्या दोन दशकांपासून संस्थेने जपली आहे. विविध क्षेत्रातील गुरुजनांच्या गुणगौरवाची ही प्रथा या पुरस्काराच्या निमित्ताने अखंडितपणे पुढे नेण्याचा निर्धार संयोजकांनी व्यक्त केला आहे.
सामाजिक, सांस्कृतिक या सोबतच औद्योगिक कृषी मराठीच्या विविध क्षेत्रातील, मान्यवरांचा इथे गौरव होणार आहे. ज्योतीने ज्योत लावावी तशाच पद्धतीने एका ज्योतीने दुसरी ज्योत प्रकाशमान होते. त्याचप्रमाणे या गुणवंतांचा गौरव करून नवे गुणवंत निर्माण करण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून होत आहे, असेही यावेळी मान्यवरांनी त्यांच्या भाषणात सांगितले.
सांस्कृतिक प्रदूषण टाळण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागणार आहेत आणि हे सर्व प्रयत्न आपण सर्वजण एकमेकांना विश्वासात घेऊन करूया,सध्या काही राज्यात अध्यक्ष आहे, पक्ष नाही आणि पक्ष आहे तर अध्यक्ष नाही अशी परिस्थिती झाली होती. हे सामाजिक व्यवस्थेचे जिवंत उदाहरण आहे, भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नागरिकांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनच्या कार्याचा गौरव केला फाउंडेशनचे कार्याध्यक्ष राजीव लोहार, उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर, धनंजय कुंभार, दगडू माने आणि महिला अध्यक्ष साै मनिषा लोहार आदींनी मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी महादेव अडागळे, राजेंद्र निकुंभ, विकास जाधव, विलास कोळी, मल्हारी पेटकर, पत्रकार विलास ओहाळ, शिवाजी बाबर, आदींची उपस्थिती होती.
कु. प्राजक्ता लोहार हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमात आरती काळे नगरकर, वैशाली वाफळेकर, प्रीती शिंदे, माया अंधारे, वैशाली समसापुरकर या नामांकित लोककलाकारांनी बहारदार लावणी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
गुणीजनांच्या गुणगौरवाचे समाधान – दत्ता मर्ढेकर.

“पत्रकारिता समाजहितार्थ” हे ब्रीदवाक्य घेऊन महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन ही संस्था अध्यक्ष राजीव लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असल्याचे सांगून ज्येष्ठ पत्रकार व फाउंडेशनचे उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर म्हणाले की, सन २००६ मध्ये पहिल्या पुरस्कार वितरणावेळी गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, ॲड. दयानंद नार्वेकर आदी मान्यवर उपस्थित होते. पत्रकारांचे विविध प्रश्न सोडवण्याबरोबरच विविध क्षेत्रातील गुणीजनांचा गुणगौरव करण्यासाठी दरवर्षी प्राइड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्ड सोहळा संपन्न होतो.
आजवर ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर, राधा मंगेशकर, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, श्रीपाद नाईक, दिगंबर कामत, माजी खासदार (कै.) लक्ष्मणराव पाटील, ज्येष्ठ समाजसेविका (कै.) सिंधुताई सपकाळ, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, ज्येष्ठ कलावंत यशवंत देव, मिलिंद गुणाजी, मुंबईचे महापौर दत्ता दळवी, आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे, पत्रकारांचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ शिंदे, शेकापचे नेते पाटील (कै.) प्रा. डॉ. एन. डी. पाटील, शिक्षक आमदार (कै.) शिवाजीराव पाटील आदि दिग्गजांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे.
राज्यपातळीवरील पुरस्कार वितरण सोहळा मार्चमध्ये अलिबाग, महाड वाशी येथे होत असतो तर प्राईड ऑफ महाराष्ट्र भास्कर ॲवॉर्ड हा मे मध्ये गोवा येथे होत असतो. याशिवाय जागतिक महिला दिनाचे निमित्ताने नवदुर्गा पुरस्कार हा मार्च मध्ये आयोजित केला जातो. समाजातील गुणवंत, यशवंत व्यक्तिमत्त्वांना सन्मानित करून त्यांचा आदर्श समाजासमोर ठेवण्यासाठी या पुरस्कार वितरण सोहळ्याचा निश्चितच उपयोग होत असल्याचे समाधान वाटते.













