Tue, Mar 3, 2026
सातारा जिल्हा

श्रीमंत सरदार रा.रा. रायाजीराजे जाधवराव यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र मुजरा.

श्रीमंत सरदार रा.रा. रायाजीराजे जाधवराव यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र मुजरा.
Ashok Ithape
  • PublishedFebruary 25, 2024

इतिहास प्रेमी स्वप्नील जाधवराव यांनी भुईंज जाधवराव घराण्याचा घेतलेला ऐतिहासिक आढावा.

भुईंज : महेंद्रआबा जाधवराव-

श्रीमंत शाहू छत्रपती यांचे अत्यंत विश्वासू सरदार म्हणून पालखेडच्या लढाईत शौर्य गाजवून २५ फेब्रुवारी १७२८ रोजी रायाजीराजेंना वीरमरण आले. रायाजीरावांना भुईंजसह नगर जिल्ह्यातील ब्राह्मणी, महालगाव व पिंपळगाव येथील पाटीलकी व इनाम जमिनी होत्या. शाहू महाराजांच्या काळात आपल्या पराक्रमाने रायाजींनी अनेक अधिकार मिळवले. ह्यात गंगापूर महालाची चौथाई वसुली, राहुरी आणि अंमळनेरचा मोकासा आणि संपूर्ण निरथडी प्रांतातील सरंजामासाठीची नेमणूक व पाटीलकी वतनाचे उत्पन्न मिळून रायाजीरावांना १५ लाख रुपयांचा एकूण सरंजाम होता.
त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भुईंज येथे शिल्पवैभवाने नटलेले आणि त्यांच्या प्रतिष्ठेला साजेसे विशाल समाधी मंदिर बांधण्यात आले होते.
रायाजीराजे आणि त्यांच्या पत्नीची द्वैयलिंगी समाधी व मुर्ती आहे.

शिवरायांच्या जन्माच्या बरोबर ८-९ महिने आधी निजामशाह ने दगलबाजीने जिजाऊसाहेबांचे वडील श्रीमंत लखुजीराजे जाधवराव यांची हत्या केली. शिवबा ३ वर्षाचे असताना दुखवटा काढायला जिजाऊ सिंदखेडराजा येथे गेल्या. शिवबांसोबत त्या तब्बल दोन वर्षे तिथेच होत्या.

माघारी येताना जिजाऊ आपल्यासोबत आपल्या आई म्हाळसाबाईराणी व आपले थोरले भाचे युवराज यशवंतराव (जे आजोबा लखुजींसोबत मारले गेले होते) यांचे कुटुंब तसेच आपले बंधू रघुजीराजे व अचलोजीराजे यांचे कुटुंब घेऊन पुण्यास आल्या.  स्वराज्याच्या स्थापनेपासूनच या सर्व मंडळींनी पिढ्यानपिढ्या स्वराज्यासाठी मौलिक कामगिरी केली. अचलोजीराजेंचे पुत्र संताजी शिवबंधू संभाजीराजेंसोबत कनकगीरीच्या लढाईत मारले गेले. तर त्यांचे पुत्र शंभूसिंह यांनी शिवरायांचे रक्षण करताना पावनखिंडीत समर्पण केले. याच शंभूसिंहांचे सुपुत्र म्हणजे स्वराज्य तोलून धरणारे वीर सेनापती धनाजीराव जाधवराव.

तर जिजाऊंचे भाचे युवराज यशवंतराव यांचे सुपुत्र लखमोजी उर्फ लखुजी दुसरे यांनी अनेक वर्षे सिंहगडाची किल्लेदारी केली. पुढे त्यांचे पुत्र खंडोजीराजे यांना किल्ले वैराटगडाची किल्लेदारी मिळाली. तसेच वाई परगण्याची इनामदारी मिळाल्याने अनेक गावांची पाटीलकी वतन करत ते भुईंजमध्ये स्थायीक झाले. खंडोजीराजांचे थोरले नातू आणि पराक्रमी वीर म्हणजे रायाजीराजे जाधवराव.

भुईंजच्या याच कर्तबगार कुटुंबात जिजाऊंच्या पुढाकाराने शिवछत्रपतींनी आपली थोरली कन्या राणूबाई आक्कासाहेब यांचा विवाह करुन दिला. या नात्याने जिजाऊंनी पुन्हा आपले हक्काचे माहेर जवळ केले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!