Mon, Mar 2, 2026
सातारा जिल्हा

लोकशाहीर विठ्ठल उमप निर्मिती प्रस्तुत, प्रसिद्ध कलाकार नंदेश उमप यांच्या ‘शिव सोहळा’ या ऐतिहासिक कार्यक्रमाने सातारकर रसिकांची मने जिंकली.

लोकशाहीर विठ्ठल उमप निर्मिती प्रस्तुत, प्रसिद्ध कलाकार नंदेश उमप यांच्या ‘शिव सोहळा’ या ऐतिहासिक कार्यक्रमाने सातारकर रसिकांची मने जिंकली.
Ashok Ithape
  • PublishedFebruary 18, 2024

भुईंज।महेंद्रआबा जाधवराव

शिवजयंती महोत्सवानिमित्त गांधी मैदान, राजवाडा येथे लोकशाहीर विठ्ठल उमप निर्मिती प्रस्तुत, प्रसिद्ध कलाकार नंदेश उमप यांच्या ‘शिव सोहळा’ या ऐतिहासिक कार्यक्रमाने सातारकर रसिकांची मने जिंकली. ‘शिव सोहळा’ मधून नंदेश उमप आणि त्यांच्या १०० कलाकारांच्या टीमने छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट रसिकांसमोर मांडला. हा कर्यक्रम पाहण्यासाठी अलोट गर्दी झाल्याने गांधी मैदान तुडुंब भरून गेले.

ऐतिहासिक सातारा शहरात आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती महोत्सव समिती राजधानी सातारा यांच्यावतीने दि. १७ ते दि. १९ असे तीन दिवस शिवजयंती महोत्सव २०२४ आयोजित करण्यात आला असून महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, शनिवारी सायंकाळी नंदेश उमप यांच्या ‘शिव सोहळा’ या अंगावर रोमांच आणणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन गांधी मैदान येथे करण्यात आले होते. हा कर्यक्रम पाहण्यासाठी अबालवृद्धांसह अवघा जनसागर लोटला होता. कार्यक्रमाचा शुभारंभ आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या हस्ते शिवप्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. यावेळी अर्जुन पुरस्कार विजेती खेळाडू अदिती स्वामी आणि जेईई परीक्षेत ९९.६१ टक्के गुण मिळवलेल्या पृथ्वीराज सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला.

शिवजन्मापासून ते शिवरायांच्या राज्याभिषेकापर्यंत छत्रपती शिवरायांच्या जीवनातील विविध घटना, पराक्रमांचे सादरीकरण ‘शिव सोहळा’ या कार्यक्रमाद्वारे करण्यात आले. अफजल खान वध, पावन खिंड युद्ध यासह अनेक घटनांचे सादरीकरण कार्यक्रमाद्वारे झाले. प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या कडकडाटाने आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज कि जय’ अशा जयघोषाने गांधी मैदान दुमदुमून गेले. नंदेश उमप यांनी सादर केलेल्या अफजल खान वध या पोवाड्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. कार्यक्रमाचे नेटके नियोजन शिवजयंती महोत्सव समिती राजधानी सातारा यांच्यावतीने करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!