एकजुटीच्या अफाट शक्तीतून रथसप्तमीचा दिमाखदार सोहळा संपन्न
भुईंंज : ढोल ताशांचा निनाद, हलगीचा कडकडाट, शिंग तुतार्यांचा रणभेदी निनाद, मर्दानी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके, लक्ष लक्ष दिव्यांच्या झगमगाटात उजळून गेलेली आचार्य रथाची मिरवणूक आणि त्यास ग्रामस्थांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसादात अशा उत्सवी वातावरणात सर्वांच्या सहकार्याने भुईंज येथील युवकांच्या एकजुटीतून साकारलेल्या अफाट शक्तीने रथसप्तमी सोहळा दिमाखात पार पडला.
सदगुरु नारायणअण्णा महाराज यांच्या प्रेरणेने भुईंज येथे स्थापन झालेल्या भृगुऋषी मठाचा वर्धापनदिन सोहळा मोठ्या जल्लोषी व उत्साहाच्या वातावरणात पार पडला. विशेषत: भुईंजमधील युवा वर्गाने पुढाकार घेवून या सोहळ्याला भव्य, दिमाखदार व लोकोत्सवाचे रुप प्राप्त करुन दिले आहे. त्याच रुपाचा साक्षात्कार सलग दुसर्यावर्षी झाला.
फुलांनी सजवलेल्या आचार्य रथातून भृगुऋषी महाराजांच्या प्रतिमेची व पालखीची मिरवणूक सुरु झाली त्यावेळी या उत्सवाचा उत्साह टिपेला पोहोचला. घोडेस्वार, पारंपरीक वाद्यांसोबत, मर्दानी खेळ व नेत्रदिपक रोषणाईने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या सोहळ्याच्या निमित्ताने मठावर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. या निमित्ताने कृष्णामाईचे पूजन व मठावरील भृगुऋषी महाराज समाधी, दत्त मंदिर, गणेश मंदिर, दुर्गामाता मंदिरात धार्मिक कार्यक्रम व होमहवन पार पडले.
आशिष भोसले पाटील, अनिल लोखंडे, घनशाम जाधवराव, अभिजित भुजबळ, सुमित शिंदे, दिनेश देशमुख, कुणाल खरे, अथर्व गवळी, दत्ता पोळ, मोहन भोसले, करण शिंदे व त्यांच्या सर्व युवा सहकर्यांनी या सोहळ्यास सहकार्य करणार्या विविध संस्था, मंडळे व व्यक्तिंचा सन्मान केला. यावेळी सरपंच विजय वेळे, उपसरपंच शुभम पवार, मोहनराव भोसले, भैय्यासाहेब जाधवराव, गजानन भोसले, विलासभाऊ जाधवराव, बाळासाहेब भोसले, रामदासबापू जाधव, विजयबापू भोसले, अशोक जाधवराव, सुनील शेवते जयवर्धन जाधवराव, संजय शिंदे, जितेंद्र वारागडे, आनंद जाधवराव विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. अथर्व खरे यांनी सूत्रसंचालन केले, अतुल भोसले यांनी आभार मानले. महाआरती व महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली.













