Wed, Feb 25, 2026
अध्यात्म

ग्रामविकासातून सुदृढ भारताची पायाभरणी : चंद्रकांत दळवी

ग्रामविकासातून सुदृढ भारताची पायाभरणी : चंद्रकांत दळवी
Ashok Ithape
  • PublishedFebruary 10, 2024

चंद्रकांत दळवी यांनी भुईंज येथील पारायण सोहळ्यात सांगितले एकीचे बळ

भुईंंज : संपूर्ण गावाने जर एकत्र येवून ठरवलं तर गावाचा विकास ही काही अशक्य गोष्ट नाही. एखाद्या गावात सुरु झालेली हागणदारीमुक्‍त गावाची योजना जेव्हा राज्याचा, देशाचा महत्वपूर्ण कार्यक्रम होतो तेव्हा ग्रामविकासातून सदृढ भारताची पायाभरणी होते हे दिसून येते. त्यासाठी ग्रामस्थांनी एकीचे बळ उंचावण्याची गरज असून निढख सारख्या दुष्काळी गावात जे होते ते समृद्ध गावात का होत नाही? असा सवाल निवृत्त सनदी अधिकारी व रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी भुईंज येथे बोलताना उपस्थित केला.

भुईंज येथील ज्ञानेश्‍वरी पारायण मंडळाच्या वतीने पारायण सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या कृष्णाकाठचे ज्ञानसत्र या व्याख्यानमालेत ते बोलत होते. अध्यक्षस्थाळी ज्येष्ठ नागरिक संघाचे राज्याचे अध्यक्ष विठ्ठलराव जाधवराव तर प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य भैय्यासाहेब जाधवराव उपस्थित होते. दळवी पुढे म्हणाले, की गावाचा विकास साधताना सर्व काही शासन करेल ही भावना गैर आहे. किंबहुना अनेक गावात यशस्वी झालेले प्रकल्प पुढे शासनाने स्विकारले आहेत.

स्व. आर. आर. पाटील यांच्या सोबत काम करत असताना ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्‍त अभियानात जे योगदान देता आले त्या पाठची प्रेरणा ही 1983 सालापासून निढळ गावात केलेले काम होते. स्वत:च्या निढळ गावी मुंबई, पुणेस्थित नोकरदारांना एकत्र येवून आर्थिक पाठबळ उभे करुन ग्रामविकासाला चालना दिली. आज ते गाव सर्व बाबतीत स्वयंपूर्ण आहे. या गावाला स्वच्छता अभियानात प्रथम क्रमांक मिळाल्यानंतर काहींनी प्रश्‍न उपस्थित केले. पण त्याच प्रश्‍नकर्त्यांना जेव्हा गावात आणून गावातील कामे दाखवली त्यानंतर त्यांनी भरभरुन कौतुक केले. त्यामुळे कामावर लक्ष केंद्रीत करुन एकजुटीतून ग्रामविकास साधणे शक्य असून त्यासाठी इच्छाशक्ती हवी.

यावेळी विठ्ठलराव जाधवराव यांनीही मनोगत व्यक्‍त केले. पाहुण्यांचे स्वागत रामदास जाधव यांनी केले. जयवंत पिसाळ यांनी सूत्रसंचालन केले. जगन्नाथ दगडे यांनी आभार मानले.
……………………………………………………………………….

पारायणात व्याख्यानमाला कौतुकास्पदपा रायणासारख्या अध्यात्मिक सोहळ्यात व्याख्यानमालेचे आयोजन ही संकल्पनाच कौतुकास्पद असून त्याबद्दल संयोजकांना धन्यवाद दिले पाहिजेत. या ठिकाणी सभागृह भरुन असणारी प्रचंड उपस्थिती मोलाची असून व्याख्यानाला असा प्रतिसाद शहरी भागातही फारसा मिळत नाही, असेही कौतुकोद‍्गार चंद्रकांत दळवी यांनी काढून यावर्षीच्या निढळ गावच्या पारायणात आपण अठराव्या अध्यायाचे वाचन करणार असल्याचे सांगितले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!