मराठा घरातील संस्कारमयी अनोख्या भेटीने भारावल्या सर्वेक्षणासाठी आलेल्या प्रगणक शिक्षिका.
भुईंज। महेंद्रआबा जाधव :
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षण करण्यात येत आहे. पहिली पास आणि मोबाईल ॲपचा गंध नसलेले
अशिक्षित प्रगणक, तांत्रिक अडचणी व बहिष्कार यामुळे सर्वेक्षणाचे तीन तेरा वाजवल्याचे चित्र एकिकडे असतानाच
वाई तालुक्यातील शासकीय यंत्रणा आणि प्रगणक कटिबद्ध होऊन काम करीत आसल्याचेही ठिकठिकाणी अनुभवास येत आहे.
वाई तालुक्यात सर्वेक्षणासाठी आलेल्या प्रगणकांचा ग्रामीण भागात ठिकठिकाणी पाहुणचार केला जात आहे. सर्वेक्षणाकरिता भुईंज येथे आलेल्या प्रगणक शिक्षिका सौ.शैला यादव यांची सौ.वनिता जाधव यांनी खणा-नारळाने ओटी भरून त्यांना साडी-चोळी भेट दिली. या मराठा घरातील संस्कारमयी अनोख्या भेटीने सौ.यादव अगदी भारावून गेल्या.
या सर्वेक्षणासाठी मागासवर्ग आयोगाकडून एक प्रश्नावली निश्चित केली आहे. त्यानुसार मुख्यतः पाच प्रकारात प्रश्न विचारले जात आहेत.
यातल्या मॉड्यूल ए मध्ये तुमच्या कुटुंबाची मूलभूत माहिती, तुमचं नाव, पत्ता, तुम्ही मराठा आहात का, नसाल तर तुमची जात कोणती असे एकूण 14 प्रश्न विचारले जातात.
मॉड्यूल बी मध्ये तुम्ही कोणत्या घरात राहता? तुमचं कुटुंब संयुक्त आहे की विभक्त आहे? तुमच्या जातीचा पारंपरिक व्यवसाय कोणता? सध्या तुम्ही काय करता? तुमच्या कुटुंबात लोकप्रतिनिधी आहेत का? असे एकूण 20 प्रश्न आहेत.
मॉड्यूल ‘सी’ मध्ये तुमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात असून घरात शौचालय आहे का? शेती आहे का? असेल तर ती कुणाच्या नावावर आहे? तुमच्या कुटुंबावर किती कर्ज आहे? मागच्या पंधरा वर्षांमध्ये तुम्ही स्थावर मालमत्ता विकली आहे का? तुमच्या कुटुंबातील एखादी महिला इतरांच्या घरी धुणी भांडी, स्वयंपाक, झाडलोट करायला जाते का? असे एकूण 76 प्रश्न आहेत.
या प्रश्नावलीच्या मॉड्यूल ‘डी’मध्ये समाजाचं मागासलेपण तपासलं जाते. तुमच्या समाजात हुंडा देण्याची पद्धत आहे का? विधवा स्त्रियांना मंगळसूत्र घालण्याची परवानगी आहे का? तुमच्या कुटुंबात मुलांच्या लग्नाचा निर्णय कोण घेतं? गेल्या दहा वर्षांत तुमच्या कुटुंबातील कुणी आत्महत्या केली आहे का?
असे एकूण 33 प्रश्न आहेत.
आणि मॉड्यूल ‘ई’मध्ये कुटुंबाच्या आरोग्याबाबत एकूण अकरा प्रश्न विचारले जातील. तर असे एकूण 154 प्रश्न विचारून तुमचे कुटुंब सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास आहे की नाही हे ठरवलं जाणार आहे.
खुल्या प्रवर्गाच्या तुलनेत मराठा आरक्षणाबाबत अचूक माहिती सर्वेच्या माध्यमातून यावी यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून प्रशासनाला आदेश दिले गेले आहेत. ग्रामपातळी पासून ते महानगरापर्यंत युद्धपातळीवर केले जाणारे सर्वेक्षण हे अचूक माहितीवर व प्रत्यक्ष घरोघरी जाऊन केले जात असल्याने याला अनन्य साधारण महत्त्व आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात व अत्यंत अल्पावधीत होणारा हा सर्वे संपूर्ण देशापुढे एक आदर्श मापदंड ठरावा यासाठी वाई तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणा आणि प्रगणक कटिबद्ध होऊन काम करीत असल्याने वाई तालुका प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे













