मुख्यमंत्र्यांनी स्वत: हाती घेतला फवारा, मुंबईत स्वच्छता अभियानाची सुरुवात
दि. 3 मुंबई :
मुंबई महानगरपालिकेच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या संपूर्ण स्वच्छता अभियानाची सुरुवात आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते झाली. मुख्यमंत्र्यांनी सायन (शीव) येथील कामाची पाहणी करुन, स्वत: रस्त्यावर पाणी मारुन या मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी, उपस्थित कामगारांशी संवाद साधून त्यांना मुंबई स्वच्छ करण्यासाठी जोमाने काम करण्याचे आवाहनही केले. तर, त्यांचे प्रश्नही जाणून ते सोडवण्याचे आश्वासनही दिले. मुख्यमंत्र्यांच्या या कृतज्ञतेने कामगार भारावून गेले होते.
स्वच्छता अभियानात एकाच वेळी संपूर्ण विभागामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून त्यासाठी पालिका अतिरिक्त मनुष्यबळ वापरून तो संपूर्ण विभाग स्वच्छ करणार आहे. यासोबतच धुळीमुळे वाढणारे प्रदूषण कमी करण्यासाठी रस्त्यांच्या दुभाजकाजवळची माती उचलणे, संपूर्ण रस्ता पाण्याने धुवून काढणे. तसेच झोपडपट्टी मध्येही अंतर्गत रस्त्यांची डागडुजी, शौचालये दिवसातून ५ वेळा स्वच्छ करणे. तसेच रस्ते, पदपथ, ब्रिज खालील परिसर आणि दुभाजक सुशोभित करण्याची कामे पूर्ण होणार आहेत.
या अभियानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मुंबई स्वच्छ आणि सुंदर बनविण्यात येणार आहे. त्यानुसार, प्रत्येक आठवड्यात मुंबईचा एक-एक प्रभाग स्वच्छ करण्यात येणार आहे. स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांनी सायन-धारावी भागात सुरु असलेल्या स्वच्छता कामाचा आढावा घेतला. तसेच स्वच्छता कामगारांशी संवाद साधून त्यांना मुंबई स्वच्छ करण्यासाठी जोमाने काम करण्याचे आवाहनही केले. तसेच त्यांच्या वसाहती अद्ययावत करण्याचा आणि आरोग्य विमा सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेऊन मुंबई स्वच्छ राखणाऱ्या या हिरोंच्या मनातील विवंचना दूर केल्याचे सांगितले.
दरम्यान, यावेळी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी तसेच मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.













